त्या दोघींची’ प्रेम कहानी…!
व्हॅलेंटाईन डे स्पेशल
असे म्हणतात की प्रेमाला नसते जातीचे,धर्माचे,वयाचे, श्रीमंती-गरिबीचे असे कुठलेच बंधन… प्रेम असल्या मानवनिर्मित कृत्रिम बंधनाच्या कितीतरी पलीकडे असते.
‘प्यार तो दिल से होता हैं, शक्ल और दौलत देखकर तो अरेंज मॅरेज की जाती हैं! ‘…अगदी असेच काही,
प्रेमाची न काही व्याख्या असते,न कुठलीच चौकट असते! दोन हृदयांनी निस्वार्थ मनाने एकमेकांना जीव लावण्याची ती एक सुंदर अशी भावना असते.
पण मोठमोठ्याल्या कवींनी, लेखकांनी, संगीतकारांनी रेखाटलेल्या,शब्दबद्ध केलेल्या या निखळ भावनेला, मुळातच स्वार्थी स्वभाव असलेला माणूस समजून घेतो काय?
सो कॉल्ड खानदान की इज्जत आणि लोग क्या कहेंगे असल्या भ्रामक,खुळचट समजूतींच्या नावाखाली कित्येक निष्पाप प्रेमी युगुलांच्या प्रेमकहाणी चा ‘सैराट’ झाल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचतो आणि एकीकडे वरून आधुनिक,उच्चशिक्षित,सुसंस्कृत,विज्ञानावादी आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्काराचा देखावा करणाऱ्या आपल्या समाजाची वास्तविकता इतकी विद्रूप आहे… या विचारानेच आपण खरचं २१ व्या शतकात राहतोय ना हा प्रश्न मनाला पडतो!
मोठ मोठ्याल्या शहरात, सुशिक्षित समाजात परिस्थिती सुधारत चालली आहे परंतु रूढीप्रिय समाजात,गावाखेड्यात आजदेखील प्रेमी युगुलांना जाती-धर्माच्या चौकटी मोडून स्वतः चे प्रेम मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून येते.एकीकडे समाजात असे द्वंद चित्र दिसत असतांनाच… समाजाच्या मुख्य प्रवाहातून कायम दुर्लक्षित असणारा, बऱ्याचवेळा टिंगलटवाळकी चे भक्ष्य होणारा,लोकांकडून अपमानित केला जाणारा LGBT समुदाय, त्यांच्या भावभावना, त्यांचे नैसर्गिक मानवी अधिकार आणि महत्त्वाचे म्हणजे अन्य ‘नाॅर्मल’ माणसांप्रमाणेच आवडत्या व्यक्तीबरोबर जीवनसाथी म्हणून आयुष्यभर राहण्याचा अगदी साहजिक अधिकार… या सगळ्यांपासून ‘LGBT’ समुदाय कायम वंचित दिसतो.याचा दुष्परिणाम असा की ‘लोग क्या कहेंगे?’ या ‘कॉमन इंडियन डिसीज’ मुळे बरेच लोक स्वतःचे मन मारून समाजासमोर शरणागती पत्कारतात पण जेव्हा मुखवट्याचे दुटप्पी आयुष्य असह्य होते तेव्हा बरेच लोक अगदी आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय घेतात.
असल्या सगळ्या परिस्थितीत स्वार्थी मानवाने बनविलेल्या समाजाच्या सगळ्या खुळचट चालिरिती झुगारून,’लोग क्या कहेंगे?’ चा विचार न करता… ‘दिल क्या कहता हैं?’ ही अंर्तमनाची हाक ऐकून संत्रानगरी नागपूरच्या भूमीवर २९ डिसेंबर,२०२१ रोजी दोन उच्चशिक्षित, धाडसी तरूणींनी साखरपुडा करून एक मोठा निर्णय घेतला आहे.
ही प्रेम कहाणी आहे, नागपूर येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुरभी मित्रा आणि कोलकाता येथील ॲमेझॉन इंडिया मध्ये अकाऊंट्स मॅनेजर या उच्चपदावर कार्यरत असलेल्या पारोमिता मुखर्जी यांची.
इतर सर्वसामान्य प्रेमकहाणी प्रमाणेच ह्या दोघींची प्रेमकहाणी आहे.कोलकात्यात मानसिक आरोग्याविषयीच्या एका परिषदेत डॉ.सुरभी मित्रा या मुख्य वक्ता म्हणून मार्गदर्शन करायला गेल्या होत्या तिथे पारोमिता या श्रोता म्हणून उपस्थित होत्या. डॉ.सुरभींच्या भाषणाने प्रभावित झालेल्या पारोमिता भाषण संपताबरोबरच डॉ.सुरभींना भेटायला गेल्या, मानसिक आरोग्याविषयी त्यांना आणखी काही प्रश्न होते ज्याची उत्तरं त्यांना डॉ.सुरभींकडून जाणून घ्यायची होती. डॉ.सुरभींनी पारोमितांना त्यांचा इन्स्टाग्राम अकाऊंट शेअर केला नंतर त्या नागपूरला निघून गेल्यात. काही दिवसांनी डॉ.सुरभी आणि पारोमिता या एकमेकींशी इन्स्टाग्राम अकाऊंट मार्फत बोलू लागल्या.आठवड्याभरातच पारोमितांनी डॉ.सुरभींना त्यांचा व्हॉट्स अप नंबर मागितला.मग रोज व्हॉट्सवर चॅट, कधी कॉल वर संवाद तर कधी व्हिडिओ कॉल अश्या प्रकारे लव्ह बर्ड्स च्या प्रेमाला उधाण येऊ लागला.सगळे सुरळीतपणे चालले होते की अचानकच काही कारणास्तव डॉ.सुरभींचा मोबाईल आठवडाभर बंद राहिला. कॉल केला तर कॉल लागेना,व्हॉट्स अप च्या मेसेजेस चे पण रिप्लाय नाही यामुळे पारोमिता फारच अस्वस्थ झाल्यात.त्यांना डॉ.सुरभींची चिंता सतावू लागली, त्यांचे कशातच मन लागेना… शेवटी आठवडाभरानंतर डॉ.सुरभींनी पारोमितांना मॅसेज केला ‘एका फ्रेंडचा अपघात झाल्यामुळे मी व्यस्त होते आणि माझ्या मोबाईल मध्ये काही बिघाड आला होता यामुळे मी तुझ्याशी बोलू शकले नाही’.डॉ.सुरभींचा मॅसेज पाहून जीवात जीव आलेल्या पारोमिता त्यांना एकच प्रश्न विचारतात ‘आप बस जिंदा हो या नहीं ये बातादो? ‘.
आणि आठवडाभर त्यांच्याशी संवाद न होऊ शकल्यामुळे आपणास काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव झाल्याचे पारोमितांनी डॉ. सुरभींना सांगितले.’आय थिंक आय लाईक यू, मे बी मोर दॅन दॅट! ‘ असे म्हणत पहिल्यांदाच हृदयातील गोष्ट ओठांवर आली.बऱ्याच दिवसांपासून दोघींचा फ्रेंड्स सोबत पिकनिकला जाण्याचा विचार होताच… पुढे पारोमिता डॉ.सुरभींना म्हणाल्या ‘मैं अगर वहा पे (पिकनिकला) सबके सामने आपको प्रपोज करू तो आप ना तो नहीं कहोंगे?’
त्यावर डॉ. सुरभी उत्तरल्या ‘क्यो? ना कहने की वजह क्या हो सकती हैं? अश्या प्रकारे अप्रत्यक्षपणे डॉ.सुरभींनी प्रेमाला होकार दर्शविला.
मग डॉ.सुरभींनी पारोमितांचे पिकनिक टिकीट रद्द करून नागपूर साठीचे टिकीट पक्के केलेत. नागपूरात डॉ.सुरभींच्या घरी दोघींची भेट झाली.मित्रमंडळी, घरची माणसे, नातलग सर्वांशी पारोमितांची गट्टी जमली.मग काय? आई-वडिलांची एकमेव लेक असलेल्या डॉ.सुरभींच्या आई-वडिलांना डॉ.सुरभींच्या होमोसेक्शुआलिटी बाबत फार पूर्वीपासून माहिती होते.लेकीच्या आवडीचा मान राखत आणि तिच्या धाडसी निर्णयाचे स्वागत करत डॉ.सुरभींच्या आई-वडिलांनी डॉ.सुरभी आणि पारोमिता यांच्या नात्याला मान्यता दिली. पारोमितांच्या घरच्यांनी सुद्धा अगदी सहजरित्या होकार दिला. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या डॉ.सुरभी आणि पारोमितांनी निव्वळ ‘लिव इन’ प्रमाणे सोबत न राहता आपल्या नात्याला एक नाव देण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेवटी आई-वडिलांचा आर्शिवाद, मित्र-मंडळीच्या शुभेच्छांसहीत २९ डिसेंबर, २०२१ रोजी नागपूरात मोठ्या थाटात दोघींचा साखरपुडा (कमिटमेंट सेरिमनी) पार पडला.लवकरच दोघी लग्नबेडीत अडकण्याच्या विचारात आहेत आणि इतकेच नव्हे तर एकतर दत्तक घेऊन किंवा सरोगसी अथवा आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोघींनी चाईल्ड प्लानिंग्स सुद्धा केल्या आहेत. दोघींनी एकमेकींचं नाव लावायचा निर्णयही घेतला आहे.
भारतात अजूनही समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही.समलिंगी नात्यांविषयी अजूनही बरेच गैरसमज आहेत.त्यामुळे अश्या लग्नांना ‘सिव्हिल युनियन’ म्हणून ओळखलं जातं. LGBT समुदायाचा हा लढा अजूनही कायम आहे. पण एक मात्र नक्की की डॉ.सुरभी आणि पारोमितांच्या या धाडसी निर्णयामुळे बऱ्याच लोकांना स्वतः चा स्विकार करून स्वतंत्र जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.
आणि खरचं प्रेमाला कसलेच बंधन नसते हे परत एकदा सिद्ध झालेले आहे.
-निकिता शालिकराम बोंदरे.
कोराडी, नागपूर.
Email – nikitabondre1234@gmail.com