वर्धा -/ वर्धा शहरात सुरू असलेल्या ब्लिन्कीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमुळे सुमारे 200 युवकांना रोजगार मिळाला आहे. मात्र पार्किंगच्या मुद्द्यावरून ब्लिन्कीट रायडर्सना जाणूनबुजून अडचणीत आणले जात असून, याबाबत वर्ध्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ब्लिन्कीट रायडर्सकडून कडक निवेदन देण्यात आले आहे.
ब्लिन्कीट स्टोअरसमोरील जागा ‘नो पार्किंग’ घोषित असली तरी कामाच्या स्वरूपासाठी आवश्यक असलेल्या रायडर्सच्या दुचाकी वाहनांना कोणताही पर्याय न देता सरसकट चलान कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एका स्थानिक व्यक्तीच्या दबावामुळे होत असल्याचा गंभीर आरोप रायडर्सनी केला आहे.
एका व्यक्तीला स्वतःची चारचाकी गाडी उभी करता येत नसल्यामुळे 200 कामगारांच्या रोजगारावर थेट गदा येणे हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचे मत रायडर्सनी व्यक्त केले. रोजंदारीवर काम करणारे युवक दररोज चलान, दंड व मानसिक त्रासाला सामोरे जात असून अनेकजण नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.
या प्रकरणी ब्लिन्कीट रायडर्सनी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांना कडक शब्दांत निवेदन देऊन पुढील मागण्या केल्या आहेत :
स्टोअरसमोरील जागेत ब्लिन्कीट रायडर्सच्या दुचाकींसाठी विशेष व नियंत्रित पार्किंग परवानगी द्यावी
कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील चलान कारवाई तात्काळ थांबवावी
एका व्यक्तीच्या दबावावर होणाऱ्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी
रोजगार देणाऱ्या कंपनीवर अप्रत्यक्ष दबाव आणणाऱ्यांवर कारवाई करावी
“वर्धा हा गांधी जिल्हा आहे. इथे रोजगार करणाऱ्या युवकांना न्याय न मिळाल्यास प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण होतील,” असा इशारा रायडर्सनी दिला आहे.
प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्लिन्कीट रायडर्सकडून देण्यात आला आहे.