🔥मध्यरात्री वेशांतर करीत शेगाव महसूलचा गौण खनिजावर छापा,जेसीबी जप्त.
शेगाव -/वाळू तस्करांचे खबरे महसूल अधिकाऱ्यांचे विस्तृत लोकेशन देत असताना, शेगाव महसूल विभागाने वेशांतर करून छापा टाकत भास्तन शिवारातील पूर्णा नदीतून अवैद्य गौण खनिज करणारे जेसीबी वाहन ताब्यात घेतल्याची घटना १४ जून रोजी मध्यरात्री घडली.जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी बोकाळली असून,कार्यवाही करायला पुढे आलेल्या महसुल अधिकारी, कर्मचारी यांना वाळू तस्करांकडून धमकी,शिवीगाळ करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. महसूल अधिकारी कार्यवाही साठी जाताना वाळू तस्करांचे खबरे इत्यंभूत लोकेशन टाकत असल्याने वाळू तस्कर वेळीच सावध होत असतात. त्यावर शेगाव महसुलने उपाय काढत पोलिसांप्रमाणे वेशांतर करून छापा टाकण्याची योजना तयार केली असताना,भास्तान शिवारात नदीपात्रात जेसीबीने वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार दीपक बाजड यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी संजय ढमाळ, रवींद्र मुंडे, राजेश राठोड ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत हाके, वैभव देशमुख, अक्षय चौधरी, अरुण डाबेराव, अमोल गीते, नितीन जुमडे महसूल सेवक गोपाल कोकाटे, कृष्णा सोळंके, ईश्वर वावरे, प्रभाकर बघे यांचे पथक वेशांतर करून १४ जूनच्या मध्यरात्री एक वाजता एका मालवाहू पिकअप मध्ये बसले, पिकअप ताडपत्रीने झाकून पूर्ण नदीस ४० किलोमीटरचा वळसा घालून एका गोपनीय कठीण अशा मार्गाने, भास्तान नदी पात्रात मध्यरात्री दोनच्या सुमारास पोहोचले वाळू तस्करांचे खबऱ्यांनी चालकास गाडीत काय? आहे याची विचारणा सुद्धा केली गाडीत माल असल्याचे सांगितल्याने वाळूतस्कर बेसावध झाले. त्यामुळे महसूल विभागाने पूर्णा नदीत छापा टाकून वाळू उपसा करणारी जेसीबी जप्त करून जलंब पोलिस स्टेशनला लावली आहे. मध्यरात्री वेशांतर करून महसूल विभागाने गौण खनिजावर छापा टाकल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून, त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
शेगाव महसूल अंतर्गत अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागाचे विविध पथक नजर ठेवून कार्यवाही करीत असून ही कार्यवाही आगामी काळात आणखी तीव्र केल्या जाईल. (दीपक बाजड तहसीलदार शेगाव)