हिंगणघाट -/ एखाद्या गरजू रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला की स्वतःच्या दुचाकीला किक मारून पळणाऱ्या मित्राला, त्याच्या मित्रांनी वर्गणी जमा करून कार भेट दिली. या पठ्ठचाने काय करावे, तर त्याला भेट मिळालेली कार विकून जुनी रुग्णवाहिका विकत घेण्याचा निर्णय घेतला. येथील गजू कुबडे या रुग्ण भक्ताच्या सुखाला तिलांजली देऊन गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी निःशुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे दररोज अपघात होतात. अपघातानंतर दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विलंब झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे रुग्णवाहिकेने अपघातग्रस्तांना अपघात रुग्णालयापर्यंत विनामूल्य, तर अत्यंत गरीब परिवारातील रुग्णांना सेवाग्राम, सावंगी व वर्धा येथील रुग्णालयात पोहोचविण्याची जबाबदारी रुग्णमित्र स्वतः घेणार आहे. जुनी कार कार्यकर्ते व मित्रपरिवाराने वर्गणी करून भेट दिली होती. ती गाडी स्वतः वापरण्यापेक्षा विकून एखादी घेण्याचा विचार त्यांनी कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविला. कार्यकर्त्यांनी संमती देताच त्यांनी तत्काळ ती कार विकली आणि त्याच पैशांतून जुनी रुग्णवाहिका विकत घेतली. तिला दुरुस्त करून नवीन लूक देण्यासाठी ती गॅरेजमध्ये उभी आहे. लवकरच ती जुनी रुग्णवाहिका गरजू गोरगरीब रुग्णांच्या सेवेत येणार आहे.