🔥सेवाग्राम येथे सखी अन्न सुरक्षा,शेती व पोषण या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न.
सेवाग्राम -/ येथे दिनांक 17 व 18 जून रोजी सखी अन्न सुरक्षा, शेती व पोषण या विषयावर दोन दिवसीय विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. शेलू व वर्धा तालुक्यातील 33 गावांमधील आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि गाव पातळीवरील महिला लीडर्स या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या. 30 गावांतील एकूण 90 महिलांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यशाळेमध्ये सखी अन्न सुरक्षा शेती मॉडेल, पोषणपूरक आहार प्रक्रिया, भाजीपाला साठवणूक पद्धती, अन्नातील 10 मूलभूत घटक, तसेच बाजारावर अवलंबून न राहता स्थानिक शेतीतूनच अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळपिके आणि चाऱ्याचे उत्पादन या सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “आत्ताची शेती आणि भविष्यातील अन्नसुरक्षित शेती” यामधील फरक स्पष्ट करत, महिलांना त्यांच्या गावपातळीवर सशक्त आणि स्वयंपूर्ण अन्नसाखळी कशी निर्माण करता येईल, याचे प्रशिक्षण देण्यात आले.ही कार्यशाळा स्वयं शिक्षण प्रयोग, वेल्सपण फाउंडेशन आणि डब्ल्यू एच एच जी आय झेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रशिक्षण सत्रात स्वयं शिक्षण प्रयोगच्या प्रोग्राम मॅनेजर तबसूम मोमीन, माधव गोरकट्टे, माधुरी दूधभाते आणि फिल्ड ऑफिसर ज्ञानेश्वर नावडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वेल्सपण फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर दीपक खांडे संतोष देशमुख आणि प्रोजेक्ट कॉर्डिनेटर नम्रता गव्हाळे यांनी देखील मार्गदर्शन करत महिलांना शेती व पोषण यामधील सुसंगतीचे महत्त्व पटवून दिले.कार्यशाळेला दीपाली चांडोळे (जिल्हा आशा समन्वयक) आणि तारा राजगुरे (तालुका आशा समन्वयक) यांचीही विशेष उपस्थिती होती.या कार्यशाळेदरम्यान फोकस ग्रुप डिस्कशन (FGD) घेण्यात आले. यात महिलांनी शेती, पोषण आणि अन्नसुरक्षा यावरील आपल्या अनुभवांचे सादरीकरण केले. सहभागी महिलांचा सहभाग उत्स्फूर्त, सक्रिय व प्रभावी होता. ही कार्यशाळा ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषणविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना स्थानिक अन्नसुरक्षा आणि पर्यावरणपूरक शेतीच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. महिलांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावात नक्कीच प्रभावीपणे करून अन्नदृष्ट्या सक्षम व सशक्त समाज निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.