अनाथांचा आधार हरवला: पालकमंत्री सुनील केदार यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
प्रतिनिधि/ वर्धा:
सिंधुताई सपकाळ हजारो अनाथांच्या माई होत्या. ज्याचं कुणीच नाही अशांना त्यांनी आधार दिला. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (मेघे) हे त्यांचे मुळ गाव होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने राज्यातील एक महान सामाजिक व्यक्तीमत्व आपण गमावलेलं आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुनील केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (मेघे) येथून आयुष्याची सुरुवात झालेल्या सिंधुताईंनी आपले संपुर्ण आयुष्य अनाथांना आधार देण्यासाठी घालवले. अनेक प्रकारचे कष्ट, हाल सोसून त्यांनी आपले कार्य उभे केले. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. न थकता आणि न थांबता अखंडपणे काम करण्याची त्यांची धडपड होती.
सिंधुताईंनी मदर ग्लोबल फाऊंडेशनची पुणे येथे स्थापना केली. अनाथ बालके, मुलींसाठी त्यांनी बाल सदन, बाल निकेतन, बाल भवन, बाल संगोपण, महिला आधार, छत्रालय अशा अनेक संस्था, उपक्रम त्यांनी सुरु केले. त्यांनी सांभाळ केलेली अनेक बालके आज देशात विविध ठिकाणी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहे. त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हाणी झालीच शिवाय अनाथांचा एक मोठा आधार हरवला आहे, अशा शब्दात पालकमंत्री सुनील केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.