सेलू – / वर्धा–नागपूर मार्गावरील केळझर येथील पांडवकालीन ऐतिहासिक सिद्धीविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सवानिमित्त आयोजित दिंडी सोहळ्याने एकचक्रीनगरी अक्षरशः दुमदुमून गेली. परिसरातील तब्बल १०१ दिंड्यांच्या सहभागाने हा सोहळा नेत्रदीपक ठरला.
टाळ–मृदंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या भजनी मंडळींनी गावातून पालखी काढली. भजनांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. हा सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील विविध भागांतून हजारो भाविक रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले होते.
दिंडी सोहळ्यानंतर काला, दहीहंडी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. रस्त्या–रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. रंगीत रांगोळीने रस्ते सजविण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विजयबाबू मुरारका व पत्नी यांच्या हस्ते सिद्धीविनायक व महालक्ष्मीचा अभिषेक करण्यात आला. सात दिवस चाललेल्या सप्ताहाची सांगता ह.भ.प. पुरुषोत्तम सायंकार महाराज (बोरगाव मेघे) व त्यांच्या संचाच्या भागवत कथा व काल्याच्या कीर्तनाने झाली.
यावेळी मंदिर पुजारी राममुरत मिश्रा, ह.भ.प. नामदेव ईरुटकर, पुजारी मुकुंदराव राळेगणकर, मंदिर समिती अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव सुभाष तेलरांधे, सदस्य महादेव कापसे, रामचंद्र इंगोले, गजानन नरड, अनिल तेलरांधे, महेंद्र घवघवे, किशोर महाजन, अमोल जोगे आदी उपस्थित होते.
दिंडी सोहळ्यात सहभागी भजनी मंडळींना गजानन महाराज उपगृहाचे मालक सुनील काटोले यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. केळझर गावातील सर्व स्पोर्टिंग क्लब, ग्रामस्थ व नागरिकांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीपणे पार पडला. मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले.