नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी १८ जानेवारीला मतदान
प्रतिनिधी/ सेलू:
येथील नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागासाठींच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या चार प्रभागासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १८ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान तर १९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजतापासून दिपचंद चौधरी विद्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवार दि. २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत नगरपंचायत कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. दरम्यान शनिवार दि. १ व रविवार दि. २ जानेवारी या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्र सादर करण्याकरिता ३ जानेवारीला दुपारी तीन वाजतापर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ४ जानेवारीला सकाळी अकरा वाजता पासून छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० जानेवारी दुपारी तीन वाजतापर्यतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ११ जानेवारीला निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक दोनसाठी जिल्हा परिषद शाळा, नऊसाठी यशवंत विद्यालय, दहासाठी यशवंत महाविद्यालय तर प्रभाग क्रमांक चौदासाठी दिपचंद चौधरी विद्यालय या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. बुधवार दि. १९ जानेवारीला सकाळी दहा वाजतापासून दिपचंद चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.
*दोन प्रभाग सर्वसाधारण (महिला) तर दोन सर्वसाधारण गटाकरीता*
सर्वसाधारण गटाकरीता असलेल्या चार प्रभागापैकी दोन प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. यात प्रभाग क्रमांक ९ व १० या प्रभागांचा समावेश आहे. तर प्रभाग क्रमांक २ व १४ हे सर्वसाधारण गटाकरीता खुले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक दोन व दहा मधून दोन उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज दाखल केला.