🔥हाच तो बाबा कंबलपोष यांच्या पवित्र नगरीत अवैध धंद्यांचा उच्छाद; ठाणेदारांच्या ‘अर्थपूर्ण’ मौनामुळे संसारांची राखरांगोळी!
🔥हाच तो बाबा कंबलपोष यांच्या पवित्र नगरीत अवैध धंद्यांचा उच्छाद चा व्हिडीओ.
आर्णी -/पवित्र संतांच्या वास्तव्याने पावन झालेली आर्णी नगरी सध्या एका वेगळ्याच कारणाने धुमसत आहे. एकीकडे श्रद्धेचा महाकुंभ मानली जाणारी बाबा कंबलपोष यांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असताना, दुसरीकडे याच श्रद्धेच्या सावलीत मटका, जुगार आणि अवैध धंद्यांचे फुटलेले पेव पाहून आर्णीकर सुन्न झाले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, पोलिसांच्या नाकाखाली हे काळे धंदे जोमात सुरू असताना, आर्णीचे ठाणेदार नेमकं काय करत आहेत? हा प्रश्न आता केवळ चर्चेचा विषय राहिलेला नसून, तो संतापाचा ज्वालामुखी बनला आहे. हे ठाणेदारांचे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ आहे की पडद्यामागची कोणती ‘मोठी आर्थिक उलाढाल’, याचा जाब आता जनतेला हवा आहे.
आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गा हे केवळ विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या यात्रा काळ असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. मात्र, या पवित्र परिसरात पाय ठेवताच भाविकांचे स्वागत भक्तिभावाने होण्याऐवजी मटक्याच्या आकड्यांनी आणि जुगाराच्या आरडाओरड्याने होत आहे. श्रद्धेच्या या नगरीला अवैध धंद्यांनी एखाद्या विळख्याप्रमाणे आवळून धरले आहे. हे दृश्य पाहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “हे पोलीस स्टेशन आहे की अवैध धंद्यांचे संरक्षण केंद्र?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या या मटका अड्ड्यांनी आर्णीतील कष्टकरी आणि तरुण पिढीला आपल्या जाळ्यात ओढले आहे. दिवसभर घाम गाळून कमावलेला पैसा क्षणात या जुगाराच्या टेबलवर उडवला जात आहे. यामुळे कित्येक गरिबांच्या घरची चूल पेटणे कठीण झाले असून, महिलांना आपल्या संसाराची होणारी राखरांगोळी उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे. तरुणाई व्यसनाधीनतेकडे झुकत असल्याने आर्णीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या ‘अर्थपूर्ण’ डोळेझाकीमुळे सर्वसामान्य जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे. कोणत्याही शहरात अवैध धंदे सुरू होतात, तेव्हा त्यामागे स्थानिक पोलीस प्रशासनाचे वरदहस्त असल्याशिवाय ते शक्य नसते, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या या उघड माथी गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
काय ठाणेदारांना हे अड्डे दिसत नाहीत?
की हे अड्डे चालवण्यासाठी वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत ‘हप्तेखोरी’ची साखळी सक्रिय झाली आहे?
शहरात रंगणाऱ्या चर्चांनुसार, या अवैध धंद्यांमधून मोठी ‘आर्थिक उलाढाल’ होत असून, त्यातील वाटा योग्य ठिकाणी पोहोचत असल्यानेच खाकी वर्दीने मौन धारण केले आहे. हे मौन गुन्हेगारांचे मनोबल वाढवणारे असून सामान्यांसाठी जीवघेणे ठरत आहे.
जिथे जुगार आणि मटका असतो, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपोआप एकवटतात. यामुळे शहरात वादावादी, हाणामारी आणि छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. आर्णीची शांतता भंग पावत असून सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. जर वेळीच या अड्ड्यांवर बुलडोझर फिरवला नाही, तर आर्णीत एखादी मोठी गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.(क्रमशः)