महागावात पैनगंगेच्या पात्रातील तस्करांचा नदीपात्रात धुमाकूळ!….

0

🔥महागावात पैनगंगेच्या पात्रातील तस्करांचा नदीपात्रात धुमाकूळ!….🔥हाच तो भोसा आणि थार (खु.) घाटावर पोकलॅनचा उच्छाद;नदीचे पाणी अडवल्याने बळीराजा संकटात, तहसीलदारांच्या मौनावर प्रश्नचिन्ह.?

🔥​तहसीलदारांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी.​नदीपात्रात पाणी अडवणारे बांध तत्काळ फोडून पाणी मोकळे करावे.

🔥​अवैध साठा केलेली रेती जप्त करून संबंधित जमीन मालकांवर गुन्हे दाखल करावेत,​पोकलॅन आणि हायवा सारख्या अजस्र वाहनांवर कायमस्वरूपी बंदी घालावी.

🔥​महागाव तालुक्यातील या रेती तस्करीच्या “महाभारतावर” आता जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जर त्वरित कारवाई झाली नाही, तर संतप्त शेतकरी तहसील कार्यालयावर धडक देण्याच्या तयारीत आहेत.

​यवतमाळ -/ महागाव तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून रेतीची अवैध तस्करी आता एका भयानक वळणावर पोहोचली आहे. तालुक्यातील भोसा आणि थार (खु.) या रेती घाटांवर रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, दिवसरात्र अजस्र वाहने आणि पोकलॅन मशीनच्या सहाय्याने नदीचे काळीज फाडले जात आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे महागाव तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि खुद्द तहसीलदारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने ‘महसूल विभाग तस्करांच्या खिशात आहे की काय?’ असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.​​तस्करांच्या मुजोरीने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पैनगंगा नदीचे पाणी वाहत असल्याने रेती उपसा करण्यात अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून तस्करांनी थेट नदीचे वाहते पाणीच अडवून धरले आहे. नदीचे पात्र अडवल्यामुळे प्रवाहाची दिशा बदलली असून, याचा थेट फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे. ऐन रब्बी हंगामात शेतीला लागणारे पाणी मिळत नसल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. आपल्या फायद्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा गळा घोटणाऱ्या या तस्करांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.​​मिळालेल्या माहितीनुसार, भोसा घाटावरून दररोज २०० ते ४०० टिप्पर रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. तर थार (खु.) घाटावर पोकलॅन मशीनच्या सहाय्याने उपसा करून रेतीचा साठा थेट नदीकाठावरील शेतांमध्ये केला जात आहे. रात्रीच्या अंधारात आणि दिवसाढवळ्या चालणाऱ्या या उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, कारवाई करण्यासाठी नेमलेले भरारी पथक आणि महसूल अधिकारी नेमके कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.​​काही महिन्यांपूर्वी याच परिसरात पोलिसांनी रेती तस्करांवर मोठी कारवाई केली होती. त्यावेळी तस्करांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने आत्मरक्षार्थ पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या घटनेत काही तस्करांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यांनी स्पष्ट केले होते की, “रेती तस्करी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी ही महसूल विभागाची आहे.” पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेनंतर महसूल विभागाने अधिक तत्परतेने काम करणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात चित्र उलटे दिसत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर महसूल विभागाने हात वर केल्याने तस्करांचे मनोबल अधिकच उंचावले आहे.​​तलाठी आणि मंडळ अधिकारी हे जमिनी स्तरावर कार्यरत असताना त्यांच्या डोळ्यादेखत पोकलॅन मशीन नदीत उतरतातच कशा? असा सवाल आता जनता विचारत आहे. महागाव तहसीलदारांनी या विषयावर धारण केलेले मौन हे तस्करांना दिलेले मूक संमतीच असल्याचे मानले जात आहे. ज्या घाटांवरून रोज शेकडो टिप्पर धावतात, तिथे महसूल विभागाचे अधिकारी फिरकतही नाहीत, यामागे मोठे ‘अर्थकारण’ दडल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ​सततच्या अवैध उपशामुळे नदीचे पात्र खोल गेले असून भूजल पातळी खालावली आहे. मोठ्या यंत्रांच्या वापरामुळे नदीतील जैवविविधता नष्ट होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर येत्या काळात महागाव तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पैनगंगा नदी मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 महागाव,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!