🔥व्यंकटेश जोशी,वैभव वानखडे,सीमा सिंग,डॉ.विजय दहिफळे,शिवाजी बनकर यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश.
मुंबई,वर्धा -/ राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या पाच व्यक्तींना राज्य शासन आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा समावेश आहे.
समाजसेवा, शिक्षण, शेती, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यासाठी पुरस्कार निवड समितीने पुढाकार घेतला होता. या निवड समितीमध्ये हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रमोद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांचा समावेश होता.
पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींची थोडक्यात ओळख खालीलप्रमाणे आहे.
व्यंकटेश जोशी हे सेंद्रिय शेतीचे शिक्षण शेतकऱ्यांना देतात. ते गेल्या २० वर्षांपासून मुंबई आणि नाशिक परिसरातील शेकडो पाड्यांवर मोफत दूध वाटप करत आहेत. जोशी यांचे समाजसेवा आणि शेतीविषयक कार्य मोठे योगदान आहे. भारतभर त्यांनी शेतीसाठी अनेक प्रयोग केले. वैभव वानखडे मराठी शाळांसाठी पुढाकार घेतला आहे. वैभव यांच्या माध्यमातून राज्यात अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांत मराठी शाळांचे जतन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, आणि रोजगार निर्मिती यामध्ये मोठे योगदान दिले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये महिला, युवक आणि लहान मुलांसाठी गेल्या १५ वर्षांपासून अहोरात्र कार्य करणारे नाव म्हणजे सीमा सिंग. सीमा सिंग यांचे सर्वाइकल कॅन्सरसाठी खूप मोठे योगदान आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण मिळावे, आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम भारतभर हाती घेतले आहेत. त्यांनी साडेचार हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. डॉ. विजय दहिफळे हे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडलेल्या लाखो महिला आणि पुरुषांसाठी आधारस्तंभ ठरलेले नाव आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते जगभर समुपदेशन आणि लैंगिक शिक्षणाच्या प्रचारासाठी कार्यरत आहेत. अडीच लाखांहून अधिक तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. १५ लाखांपेक्षा अधिक युवकांना लैंगिक अडचणींमधून मार्गदर्शन करून त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला आहे. शिवाजी बनकर हे माजी सैनिक असून, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्याचे महान कार्य हाती घेतले. त्याच अनाथ मुलांसाठी अकादमी सुरू केली. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व बनकर यांनी स्वीकारले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही पाचही व्यक्तिमत्त्वे आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ सर्व ‘महाराष्ट्र भूषण’चे अभिनंदन केले आहे. लवकरच मुंबईत एका शानदान कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.