🔥शहरातील मुस्लिम बांधवाचे सिंदी पोलीस स्टेशनला निवेदन सादर.
🔥नाशिकमध्ये आयोजित प्रवचनामध्ये केले होते वादग्रस्त वक्तव्य.
सिंदी (रेल्वे) -/दोन धर्मियांमध्ये जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा आशयाचे निवेदन शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सिंदी पोलीस स्टेशनचे जमादार कैलास हरणे यांच्यामार्फत प्रशासनाला दिले आहे.
रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे सप्ताहाच्या दरम्यान आयोजित प्रवचनामध्ये मुस्लिम धर्म आणि त्यांच्या धर्मगुरुंची प्रतिमा मलीन करणारे, तसेच हिंदू-मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. प्रवचनात त्यांनी असे म्हटले की, “भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. अनेक वर्षे मौलाना म्हणून काम केलेल्या व्यक्तींनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्यांना यात अन्याय आणि अत्याचाराशिवाय काहीच आढळले नाही. त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म सोडला आहे. मोहम्मंद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे?” या प्रकारच्या वक्तव्यांमुळे दोन धर्माच्या समाजांमध्ये जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, या प्रकारच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजाच्या इज्तेमांमध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन दिले जाते, जेथे मानवतेची शिकवण दिली जाते.
कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध वक्तव्ये केली जात नाहीत. तथापि, रामगीरी महाराजांच्या वक्तव्यांमुळे समाजातील एकोपा धोक्यात येऊन सामाजिक बंधूभावाला तडा जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आपण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर विविध कायद्याच्या कलमांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी शहरातील मुस्लिम बांधवांनी निवेदनातून केली आहे. यावेळी फिरोज बेरा, युसूफ बाबु, इक्बाल भाईजी, इसराईल सुफी , जमिल खान, गुलाम भाई, अस्लम पठाण, गुड्डू कुरेशी, अफजल बेरा, आबिद शेख, अखिल शेख व समस्त मुस्लिम बांधव उपस्तिथ होते.