सेलू -/ शहरातील स्मशानभूमी परिसरात अनेक दिवसांपासून मादी बिबट आणि तिच्या पिल्लाचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी वारंवार दिली होती. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. बुधवारी रात्री उशिरा रेस्क्यू केलेल्या सुमारे ८ ते ९ महिन्यांच्या बिबट्याच्या छाव्याचा काही वेळातच मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
वनविभागाने बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता छाव्याला सुरक्षित ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती हिंगणी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही वेळातच ‘त्या’ छाव्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही बाब वनविभागाने जाणीवपूर्वक दडवून ठेवली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आधीच होता इशारा, तरीही डोळेझाक? स्मशानभूमी परिसरात मादी बिबट आणि तिच्या पिल्लाचे वास्तव्य असल्याचे नागरिक सांगत होते. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याने माकडावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली होती. प्रत्यक्षदर्शींनीही त्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले होते. तरीदेखील वनविभागाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
शहरालगतच असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीवांचा शहरात तसेच गावखेड्यात सततचा वावर नवा नाही. मात्र लाखो-करोडो रुपये खर्च करूनही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पोषक वातावरण निर्माण करण्यात संबंधित यंत्रणेला अपयश येत असल्याची टीका होत आहे.
आजारी छावा, गोंधळ आणि रेस्क्यू.! मृत्यू झालेला छावा आजारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो आपल्या आईपासून वेगळा होऊन भटकत जिनिंग परिसरात आला होता. प्रकृती खालावल्याने तो बराच वेळ एकाच ठिकाणी मान टाकून बसलेला दिसत होता. नागरिकांची गर्दी आणि गोंधळ वाढल्यानंतर तो सैरभैर झाला.
रात्री उशिरा सहाय्यक उपवनसंरक्षक, रेंजर व राऊंड ऑफिसर यांच्या उपस्थितीत रेस्क्यू कारवाई करण्यात आली. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आजारी अवस्थेत असतानाही त्याच्याशी अयोग्य वागणूक करण्यात आली, शरीरावर बुटांचे पाय ठेवण्यात आले, जबरदस्ती करण्यात आली, असे आरोप पुढे येत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी त्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.
मृत्यू नेमका कशामुळे? ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच छाव्याचा मृत्यू झाला. आज गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत त्याचे अचूक वय व लिंग याबाबतही स्पष्ट माहिती नसल्याचे समजते. मृत्यूचे कारण नेमके काय, याबाबत वनविभागही साशंक असल्याची चर्चा आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
आई कुठे?
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या छाव्याची आई सध्या कुठे आहे? ती अजूनही शहर परिसरातच आहे का? नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना करण्यात येत आहे? याबाबतही वनविभागाकडे ठोस उत्तर नसल्याचे दिसते.
एकूणच, रेस्क्यू कारवाईनंतर अल्पावधीत झालेल्या या मृत्यूमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेस्क्यू की निष्काळजीपणा? छाव्याच्या मृत्यूस नेमकं जबाबदार कोण?
या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना आणि वनप्रेमींना अपेक्षित आहेत.