वर्ध्यात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी / वर्धा:
गेल्या दोन वर्षाची उणीव रामभक्तांनी आज भरून काढली. आज सकाळी 10 वाजता श्रीराम मंदिर गोल बाजार येथील राम मंदिरात श्रीराम जन्माच्या कीर्तनाला सुरुवात झाली. बाराला पाच मिनिटं बाकी असताना राम जन्माची कथा संपवत चैत्र मास त्यात नवमी तिथी राम जन्माला ग सखी राम जन्मल्याचे कीर्तनकार म्हणाले अन् मंदिरात सीयावर रामचंद्र की जयचा जयघोष झाला.
श्रावणबाळाच्या वडिलांनी दशरथाला दिलेला शाप आणि पुढे दशरथाच्या पुत्र जन्माच्या कहाणीला 12 वाजले आणि जय श्रीरामच्या जय घोषाने गोलबाजार परिसर निनादून गेला होता. मंदिरात शंखनाद, जय श्रीराम तर बाहेर मंगल वाद्याने रामजन्माचा निनाद झाला. रामजन्म होताच नऊवारी पातळातील सुहासिनींनी श्रीरामाच्या छोट्यामूर्तीला अभिषेक करून चांदीच्या पाळण्यात ठेवले. यावेळी मंदिराचे विश्वस्त, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडक उन्हातही हजारो रामभक्तांनी रामजन्माला हजेरी लावली होती. दिवसभर रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी खा. रामदास तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला मंदिराचे उपाध्यक्ष संजीव लाभे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशीकर, विजय धाबे, कमल कुलधरिया, अनघा आगवण, स्मीता काशिकर, प्रकाश परसोडकर, शिरीष जवदंड, सुधीर भूत, कृष्णधाम कृष्ण मंदिरचे अध्यक्ष हरिभाऊ वझूरकर, वर्धा नागरी बँकेचे संचालक मंगेश परसोडकर, भूषण अग्निहोत्री, मेघजित वझे, अनिरुद्ध जोशी, मधूकर जोशी, आदींची उपस्थिती होती.
कृष्णधाम येथेही रामजन्म
कारला रोड येथील कृष्णधाम कृष्ण मंदिर येथे दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्त छाया वझूरकर यांनी श्रीरामाला पाळण्यात घालून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. यावेळी कारला परिसरातील रामभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.