🔥हिच ती वाटखेड जिल्हा परिषद शाळेत गंभीर गैरप्रकारांचा पर्दाफाश! शिक्षणाऐवजी जातीय राजकारण,विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात. 🔥शिक्षकांची मनमानी, पालकांशी वाद, जातिभेदाचे आरोप; जिल्हा प्रशासन कारवाई करणार का?
वाटखेड,यवतमाळ -/वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या गंभीर गैरप्रकारांमुळे शिक्षण व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांना पुस्तकी ज्ञान,शिस्त आणि संस्कार मिळावेत या उद्देशाने कार्यरत असलेली ही शाळा सध्या दुर्लक्ष,मनमानी कारभार व जातीय राजकारणाचा बळी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी संगम बहुउद्देशीय गवळी समाज ५२८ संघटनेच्या वतीने या शाळेतील समस्या जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शाळेच्या पुनर्जीवनासाठी निधी मंजूर करण्यात आला तसेच शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात शाळेतील स्थिती समाधानकारक नसून,नावाला तीन शिक्षक असतानाही अनेक वेळा दोन किंवा एकच शिक्षक शाळेत उपस्थित असल्याचे पालक सांगतात.काही शिक्षक सतत रजेवर तर काही वेळेवर शाळेत न येत असल्याचे आरोप आहेत.
तपासादरम्यान असेही निदर्शनास आले की,पाचवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सातही विषयांचे योग्य अध्यापन,पुनरावृत्ती व मूल्यमापन होत नसून,नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी घटक चाचणी न घेता केवळ यूट्यूब व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवून जबाबदारी झटकली जात आहे.
पालकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्याध्यापक राजकुमार भोयर यांनी “मुलांना परीक्षेला नेण्याची जबाबदारी आमची नाही” असे सांगितल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
याशिवाय, शाळेतील काही शिक्षकांचे लक्ष फक्त खेळांच्या स्पर्धा, बक्षिसे व प्रसिद्धीकडे असल्याचे दिसून येते. शिक्षक धनंजय पत्रे यांनी जातिभेद करून एका विद्यार्थ्याला खो-खो स्पर्धेतून डावलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून, यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. पालकांना धमकावण्याचे प्रकारही घडल्याचे सांगितले जात आहे.
शाळेत विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी, रॅगिंगसदृश प्रकार, शालेय साहित्य चोरी यासारख्या घटना घडत असूनही शिक्षकांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणाची संगम समाचार या डिजिटल मीडियाने सखोल चौकशी केली असून, शाळा समितीतील शिक्षक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त प्रकाशित करण्यात येत आहे.
आता यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शिक्षकांची हजेरी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जातिभेदाचे आरोप व संभाव्य भ्रष्टाचार याची तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व पालकांकडून होत आहे.