सावधान.! ‘चंद्रशेखर चिकराम’ नामक भामट्याचा डिजिटल फसवणुकीचा अजब-गजब फंडा…

0

 

🔥सावधान.! हाच तो ‘चंद्रशेखर चिकराम’ नामक भामट्याचा डिजिटल फसवणुकीचा अजब-गजब फंडा.

🔥बचत गटाच्या नावाखाली हिंगणी परिसरातील महिलांची आर्थिक लूट.

🔥कर्जाच्या आमिषाने महिलांचा विश्वास संपादन, ‘रिंग अ‍ॅप’द्वारे ऑनलाईन कर्ज उचलून रक्कम पळवली.

सेलू -/ ग्रामीण भागातील गरजवंत आणि निरागस महिलांना कर्जाच्या आमिषाने जाळ्यात ओढून डिजिटल फसवणुकीचा धक्कादायक प्रकार हिंगणी परिसरात उघडकीस आला आहे. चंद्रशेखर नानाजी चिकराम नामक भामट्याने बचत गटाच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करत ऑनलाईन कर्ज उचलून थेट रक्कम लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

भामट्या चंद्रशेखर चिकराम याने गावातील आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी आधी ७ महिलांचा समूह तयार करण्यास सांगितले. त्यानंतर कर्जाच्या प्रक्रियेच्या नावाखाली प्रत्येकी ७०० रुपये ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून गोळा केली.

यानंतर महिलांचा पूर्ण विश्वास संपादन करत ‘त्या’ भामट्याने महिलांचे मोबाईल स्वतः हाताळले. यावेळी तीन महिलांचे CIBIL स्कोअर चांगले असल्याची खोटी बतावणी करत त्यांच्या मोबाईलवरून ‘रिंग अ‍ॅप’च्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज घेतले.
या प्रकरणात एका महिलेच्या बँक खात्यात २५,७५२ रुपये जमा झाले. मात्र हे पैसे महिलांना न देता, “मी माझ्या खात्यातूनच पैसे टाकले आहेत” असे सांगून त्याच भामट्याने ते पैसे परत स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. असाच प्रकार इतर महिलांच्या बाबतीतही घडला. तब्बल महिनाभर महिलांना आश्वासनांच्या जाळ्यात झुलवत ठेवण्यात आले.
दरम्यान, अचानक कर्जाच्या हप्त्यांचे संदेश महिलांच्या मोबाईलवर धडकू लागले. तेव्हा महिलांना आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरल्याचे लक्षात आले. संतप्त झालेल्या महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे हिंगणीसह परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून, डिजिटल कर्ज अ‍ॅप्सचा गैरवापर करून महिलांना फसवणाऱ्या भामट्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

👉 ग्रामीण भागातील महिलांनी अशा भामट्यांपासून वेळीच सावध राहावे, मोबाईल, ओटीपी, बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.(क्रमशः)

         सचिन धानकुटे                    साहसिक News-/24 सेलू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!