🔥सुरगाव येथे निशिगंध लागवडीची पाहणी; रेहकी कला येथे रेशीम प्रकल्पास भेट.
सेलू -/ तालुक्यातील मौजा सुरगाव येथील शेतकरी भूषण शिंदे यांच्या शेतात करण्यात आलेल्या निशिगंध लागवडीची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपरीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पिकाची वाढ, व्यवस्थापन पद्धती तसेच बाजारपेठेच्या दृष्टीने असलेले महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यानंतर पथकाने रेहकी कला येथील प्रगतिशील शेतकरी मारोती तिमांडे यांच्या रेशीम प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. रेशीम शेतीतील तांत्रिक बाबी, कोष उत्पादन प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी माहुले उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना फुलशेती व रेशीम शेती हे पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यास उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगितले. तसेच कृषी विभागामार्फत उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.