हक्काचे व सोईचे तहसील कार्यालय हवयं!
सेलू / सागर राऊत :
सेलू तहसील कार्यालय मागील अनेक वर्षापासून भाडे तत्वावर घेतले आहे. ही इमारत गैरसोईची असून वृध्द नागरिकांना तसेच दिव्यांंगाना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. तथापी, जिल्हा प्रशासनाने न्याय मागण्यासाठी येणाऱ्यांना हक्काचे व सोईचे तहसील कार्यालय मिळावे, यासाठी किसान अधिकार अभिमानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली. जनतेच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सूर्यवंशी यांना सोपविण्यात आले. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवीन तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम मागील ८ वर्षापासून सुरु आहे. सदर बांधकाम संथगतीने सुरु आहे, त्यामुळे विकास चौकातील एका इमारतीत असलेले हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांंसाठी गैरसोयीचे ठरते.येथे पिण्याचे पाणी तसेच प्रसाधनगृह देखील नाही. येथील महिला कर्मचाऱ्यांना तर आकस्मिक अडचण आल्यास इतरत्र मदतीची याचना करावी लागते. या सर्व गैरसोईबाबत संबंधितांनी लेखी निवेदने देवून सुध्दा वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी दूर्लक्ष करतात, त्याचे नेमके कारण काय? कळण्यास मार्ग नाही. जिल्हाधिकारी, वर्धा यांना दि.१६ सप्टेंबर रोजीही निवेदन देण्यात आले होते. परंतु, ते रद्दीच्या टोपलीत गेले कीं जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयात पाठविले, कोणी सांगत नाही. पालकमंत्री नाम.केदार यांनी या ज्वलंत समस्येकडे डोळसपणे बघावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाचे कार्यालय असल्याने रोज हजारो फिर्यादी मंडळींची येथे वर्दळ असते. अशिलांना बसण्यासाठी साधी बाकडं नसल्याने त्यांना दिवसभर उभे राहण्याची शिक्षा भोगावी लागते. गुरुवारी मागण्यांचे निवेदन देतेवेळी किसान अधिकारचे तालुका प्रभारी गजानन गिरडे, विठ्ठल झाडे, राहुल पोकळे, विजय भांडेकर, दिलीप भट, मनोहर तेलरांधे अशोक भट यासह इतरही नागरिक उपस्थित होते.