…अखेर अंकिताच्या मारेकऱ्यांना मिळाली जन्मठेपेची शिक्षा
इक्बाल पहलवान / हिंगणघाट :
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या प्रा.अंकिता जळीतकांडप्रकरणी आज हिंगणघाट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी आरोपी विकेश नगराळे यास आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंड अशी
शिक्षा सुनावली.
आज प्रा.अंकिताचे मृत्युला २ वर्षाचा कालावधी झाला असून अंकिताचे मृत्युदिनीच या नराधमाला उपरोक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाचे कामकाजा दरम्यान आरोपीने केलेला खुनाचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आज आरोपीला देण्यात आलेल्या शिक्षेसंबंधात सरकारी पक्षाचेवतीने आरोपीला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी विशेष शासकीय अधिवक्ता एडवोकेट उज्वल निकम यांनी केली तर बचावपक्षाचे वतीने एडवोकेट भूपेंद्र सोने यांनी आरोपी निर्दोष असल्याचे सांगून न्यायालयात अभियोजन पक्षाचेवतीने सादर करण्यात आलेले पुरावे तसेच साक्षीदार खोटे असल्याचा युक्तिवाद केला.
न्यायालयाचे आजचे कामकाजाचेवेळी आरोपी विकेश नगराळे यास ११ वाजताचे दरम्यान पोलिस बन्दोबस्तात हजर करण्यात आले,याचवेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे देखील न्यायालयीन परिसरात दाखल झाले,बचाव पक्षाचे वकील एडवोकेट भूपेंद्र सोने हे सकाळी १०.३० वाजताच न्यायालयात दाखल झाले होते.
आज सकाळी ११.१५ चे दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल भागवत यांनी खटल्याचे कामकाज सुरु करीत बचाव पक्ष तसेच अभियोजन पक्षाला आपआपली बाजू मांडण्याची शेवटली संधी दिली,
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी निकालाची प्रक्रिया पूर्ण करीत सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान शिक्षेची सुनावनी केली.
सदर खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालविन्यात आल्यानंतरही कोविडच्या प्रकोपामुळे काही काळ खटल्याचे कामकाज प्रलंबित राहिले.
आजच्या या निकालाबद्दल बचाव पक्षाचे वकील सोने यांनी असमाधान व्यक्त केले असून हा निकाल पक्षकारावर अन्याय करणारा असून आम्ही लवकरच उच्च न्यायालयात याविषयी दाद मागु असे प्रसार माध्यमाना सांगितले.