अडेगावच्या ‘इशांत मिनरल्स’चा २५ वर्षांपासून धुमाकूळ; खनिकर्म विभाग आणि खाण मालकाच्या ‘अर्थपूर्ण’ संबधांमुळे शेतकरी देशोधडीला….

0

🔥अडेगावच्या ‘इशांत मिनरल्स’चा २५ वर्षांपासून धुमाकूळ; खनिकर्म विभाग आणि खाण मालकाच्या ‘अर्थपूर्ण’ संबधांमुळे शेतकरी देशोधडीला.

🔥(​जिल्हाधिकारी विकास मीना या अवैध उत्खननाचा आणि भ्रष्टाचाराचा ‘डोलारा’ जमीनदोस्त करणार का?)
( गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.)

यवतमाळ -/ यवतमाळ जिल्हयातील वणी आणि झरी हे तालुके खनिज संपत्तीने नटलेले आहेत, मात्र हीच संपत्ती आता स्थानिक शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे. अडेगाव (ता. झरी) येथे गेल्या २५ वर्षांपासून ‘इशांत मिनरल्स’ या कंपनीने अवैध उत्खननाचा आणि शोषणाचा जो नंगानाच मांडला आहे, त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. नागपूर येथील अग्रवाल नामक उद्योजकाने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने जमिनी विकण्यास भाग पाडून, आता त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय जोशी यांची भूमिका संशयास्पद असून, त्यांच्या आशीर्वादानेच कोट्यवधींच्या महसुलाची लूट सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे.
​​पंचवीस वर्षांपूर्वी नागपूरच्या अग्रवाल नामक उद्योजकाने अडेगाव परिसरात पाऊल ठेवले. सुरुवातीला एका शेतकर्‍याला मोठ्या पैशांचे आमिष दाखवून त्याची जमीन अत्यल्प दरात खरेदी केली. त्यानंतर, गावाचा कायापालट करू, तरुणांना रोजगार देऊ आणि अडेगाव ग्रामपंचायतीचा विकास करू, अशी खोटी आश्वासने देऊन ग्रामपंचायतीकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळवले. मात्र, एकदा का हातात कागदपत्रे आली की, या कंपनीने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.
​अडेगाव, खडकी आणि गणेशपूर येथील शेतकर्‍यांना विविध मार्गांनी धमकावून किंवा प्रलोभन देऊन त्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. आज परिस्थिती अशी आहे की, जे शेतकरी एकेकाळी जमिनीचे मालक होते, ते आता भूमिहीन होऊन मजुरीसाठी भटकत आहेत.
​​ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी विकण्यास नकार दिला, त्यांना जगणे असह्य करून सोडले जात आहे. इशांत मिनरल्सच्या खाणीमध्ये दिवसभर डोलामाईट उत्खननासाठी भीषण स्फोट (Blasting) घडवून आणले जातात. या स्फोटांमुळे उडणारे दगड आणि धुळीमुळे शेजारच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे जमिनीला हादरे बसत असून, शेतकर्‍यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. “आपल्याच शेतात काम करताना आता भीती वाटते,” अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
​​नियमानुसार, कोणत्याही खाणकामासाठी आणि वाहतुकीसाठी ठराविक नियम असतात. मात्र, इशांत मिनरल्सने सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. खाणीतून काढलेला डोलामाईट राजूर (ता. वणी) येथील चुनाभट्ट्यांवर अवैध रित्या पाठवला जातो. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या वाहतुकीसाठी चक्क राखीव वनातून (Reserved Forest) रस्ता तयार करण्यात आला आहे. वनविभागाच्या नाकाखाली हा प्रकार सुरू असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​खनिकर्म अधिकारी संजय जोशींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
​या संपूर्ण काळ्या कारभाराचे सूत्रधार म्हणून जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय जोशी यांच्याकडे पाहिले जात आहे. तक्रारदारांच्या मते, जोशी यांनी खाण मालकाशी आर्थिक हितसंबंध जोपासले असून, त्यामुळेच विनापरवाना उत्खनन सुरू आहे. शासनाच्या रॉयल्टीची चोरी करून दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. खनिकर्म विभागाने कधीही या खाणीची प्रामाणिकपणे मोजणी केली नाही, असा आरोप आता जोर धरू लागला आहे.
​​अडेगावच्या ग्रामस्थांनी आता अन्यायाविरुद्ध कंबर कसली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये
१)​इशांत मिनरल्सची खाण तात्काळ बंद करण्यात यावी.
२)​ईटीएस (ETS) मोजणी करून आजवर झालेल्या अवैध उत्खननाचा हिशोब घ्यावा आणि कंपनीकडून कोट्यवधींचा दंड वसूल करावा.
३)​कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या संजय जोशी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
४)​शेतकर्‍यांच्या जमिनींचे झालेले नुकसान आणि पर्यावरणाची हानी याची भरपाई कंपनीने द्यावी.
​जिल्हाधिकार्‍यांकडे शेवटची आशा
​यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आता अडेगावच्या शेतकर्‍यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. २५ वर्षांचा हा भ्रष्टाचाराचा डोंगर जिल्हाधिकारी फोडणार का? की पुन्हा एकदा धनदांडग्यांच्या दबावाखाली प्रशासन मान झुकवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही, तर अडेगावसह परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडतील.
​या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना तुरुंगात धाडले जाते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!