सेलू -/ दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाला धडकून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना वर्धा नागपूर महामार्गावर रवीवारी ता. ११ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान खडकी जवळ घडली. राजु तुळशीराम शेंदरे असे जखमीचे नाव असून त्यांना वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजू शेंदरे हे केळझर येथून एमएच ३२ एक्यू १८६४ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने खडकी येथे जात होते. दरम्यान वर्धा नागपूर रोडवर खडकी नजीक त्यांचे वाहन अनियंत्रित होऊन पुलाला धडकले. त्यात ते रोडवर पडून गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला जबर दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याची दुचाकी पुलाच्या खाली नाल्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला आपल्या रुग्णवाहिकेतून सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी वर्धा येथे रेफर करण्यात आले.