वर्धा -/ संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या वतीने दहावी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा नेपाळच्या पोखरा येथील इंटरनॅशनल स्टेडियम येथे पार पडली.या स्पर्धेत टेबल टेनिस या खेळात 23 वर्षाआतील या वयोगटात वर्धेच्या रामनगर येथील ओम कांचन सतीश तिवारी याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून थेट सुवर्ण पदकाची कमाई केली. नेपाळ येथील स्पर्धेत सुरुवातीला पात्रता सोडत स्पर्धा झाली. सुरुवातीच्या या स्पर्धेत ओम तिवारी यांनी 3-1, 3-0 अशी आघाडी घेत विजय मिळविला. शिवाय मुख्य स्पर्धेकरिता आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर निवड करून घेतली. मुख्य स्पर्धेत 3-1, 3-0, 3-0, 3-2, 3-1 असा विजय मिळवित उपांत्य फेरी त आपली जागा निश्चित केली. उपांत्य फेरी ओम तिवारी यांनी भुटानचे खेळाडू यांगचेन लांमू यास 3-1 अंतराने धोबीपछाड दिली. इतकेच नव्हे तर अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली. टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम तिवारी यांनी नेपाळचे खेळाडू महेंद्र थापा यांना 3-2 अशा फरकाने विजय मिळवून सुवर्ण पदक पटकाविले.