आयुक्तांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला मोबाईल परत घेण्याचा निर्णय
सचिन धानकुटे/ सेलू :
एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त अग्रवाल यांच्या ठोस आश्वासनानंतर अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाईल परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला प्रश्न आयटकच्या माध्यमातून निकाली निघाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या सोबत कृती समितीची बै १६ डिसेंबर रोजी बैठक पार पडली. सदर बैठकीत आयुक्तांनी
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल व कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. शासनाच्या अखत्यारीतील अन्य सर्व मागण्यांचे प्रस्ताव देखील त्यांनी अगोदरच शासनाकडे पाठवले आहेत. नवीन मोबाईलसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून शासनाचा त्याबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक असा आहे. राज्याच्या बजेट अधिवेशनात त्यासाठीची तरतूद देखील करण्यात येईल. जानेवारी २०२२ मध्ये अंगणवाडीचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये बिघाड झाल्यास शासन स्तरावरुन दुरुस्ती करुन मिळणार असून एकही रुपया सेविकांकडून घेतला जाणार नाही. आदि बाबीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे.
सदर बैठकीनंतर कृती समितीच्या बैठकीत नवीन मोबाईल बाबत शासनाचा सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेत उर्वरित सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपापले मोबाईल प्रकल्प कार्यालयातून परत घेऊन यावेत. पोषण ट्रॅकर ऍपबाबत आपल्याला उच्च न्यायालयाने पूर्ण संरक्षण दिलेले आहे. जोपर्यंत ऍप मराठीत होत नाही व त्यातील सर्व दोष दूर होत नाहीत तोपर्यंत कुणावरही कार्यवाही होणार नाही. मंत्री महोदयांनी यासंदर्भात २१ डिसेंबरला बैठक आयोजित केली असून त्यात बाकी सर्व प्रश्नांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपापले कामकाज व्यवस्थित पार पाडावे. वजन, उंची यांची नियमितपणे नोंद घेवून करावी. आहार वाटप, गृहभेटी ही कामे करून त्यांच्या रजिस्टर मध्ये नोंदी ठेवाव्यात असे निर्णय घेण्यात आले.
सदर बैठकीला आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, एम.ए पाटील, शुभा शमीम, कमल परुळेकर, भगवान देशमुख, जिवन सुरडे, अरमाईटी इराणी, स्मिता औटी, सुमन सपरे, दत्ता देशमुख, राजेश सिंग आदि कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृती समितीने घेतलेल्या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व सेविकांनी बालविकास प्रकल्प कार्यालयात शासनास वापस केलेले मोबाईल परत घ्यावे असे आवाहन आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष विजया पावडे, सचिव वंदना कोळणकर यांनी केले आहे. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी आयटक कार्यालयात रविवार दि. १९ रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.