आरोपींशी संगनमत करून ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय सूर्यवंशी यांनी उकळले लाखो रुपये…

0

🔥शेतकरी युगल अवचट यांचा आरोप.

🔥पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर.

🔥ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची केली मागणी.

सिंदी (रेल्वे) / येथील परसोडी शिवारात शेतकरी युगल अवचट यांच्या शेतात दरोडा टाकून दोन सालगड्यांचे अपहरण करून चोरट्यांनी शेळ्या लंपास केल्या होत्या. त्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. मात्र, जप्तीतील एक वाहन, दोन मुख्य आरोपी तसेच मध्यप्रदेशातील शेळ्या खरेदी करणारा व्यापारी यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सिंदी पोलिसांनी त्या आरोपींशी संगनमत करून लाखो रुपये उकळल्याचा आरोप शेतकरी युगल अवचट यांनी केला आहे. याप्रकरणी ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकरी युगल अवचट यांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकरी युगल अवचट यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी शेतात दरोडा टाकून सालगड्यांना अमानुष मारहाण करून त्यांचे अपहरण करून शेतकरी अवचट यांच्या 51 शेळ्या चोरट्यांनी पसार केल्या होत्या. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी अवचट यांच्या मदतीने अवघ्या 24 तासाच्या आत 1 मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील चौदामैल येथून 6 आरोपींसह दोन वाहन तसेच 1 लाख 8 हजार रुपये रोख रकमेसह अटक केली होती. दरम्यान, शेतकरी अवचट यांनी एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी यांनी भेट घेऊन दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अवचट यांच्या शेतातील दोन कोंबडे खरेदी करणारे गैनलाल राणे व बबन मोहिते या आरोपींसह मध्यप्रदेशातील शेळ्या खरेदी करणारा व्यापारी याला सुद्धा अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, या 6 आरोपींना 3 फेब्रुवारीला अटक दाखवून 4 मार्च रोजी न्यायालयात हजर करून सात दिवसांचा पीसीआर घेऊन नंतर उर्वरित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितल्याचे शेतकरी अवचट सांगतात. मात्र न्यायालयाने केवळ दोन दिवसांचा पीसीआर मंजूर केला. त्यावेळी सुद्धा शेतकरी अवचट यांनी सूर्यवंशी यांची भेट घेऊन मध्यप्रदेशातील खरेदी करणारा आरोपीला तसेच गैनलाल राणे व बबन मोहितेला अटक करून त्यांच्या ताब्यातून इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची विनंती केली. परंतु, तेव्हा सुद्धा पोलिसांनी पुन्हा आपण न्यायालयाकडून आरोपींचा पीसीआर घेऊ, असे म्हणून शेतकरी अवचट यांची बोळवण केली.
सालगड्यांनी सांगितल्याप्रमाणे दरोडा टाकणारे सहा आरोपी नसून आठ आरोपी असल्याचे सांगितले. अटक केलेल्या सहा आरोपींपैकी एक मुख्य आरोपी हा कोंबडे विकत घेणारा बबन मोहिते याचा मुलगा अरुण मोहिते आहे. त्यामुळे या दरोड्यामध्ये राणे व बबन मोहिते हे दोघे सामील असतांना मात्र पोलिसांनी त्यांना आरोपी केले नाही. शिवाय जप्तीतील दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांनी सोडून दिले. धक्कादायक बाब म्हणजे ते वाहन सोडण्यासाठी एक लाख रुपये घेऊन वाहन सोडल्याचे खुद्द एका कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यानेच शेतकरी युगल यांना माहिती दिली असे अवचट यांनी तक्रारींमध्ये म्हटले आहे. परिणामी, ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी यांनी आरोपींशी संगनमत करून लाखो रूपये उकळले. त्यामुळे पोलिसांनी उर्वरित आरोपींवर कोणतीही कारवाई केली नसल्याने ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी शेतकरी युगल अवचट यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

🔥शेतकरी अवचट यांनी केलेले सर्व आरोप खोटे🔥
शेतकरी युगल अवचट यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून सदर प्रकरणात 6 आरोपी व २ मालवाहू गाड्या चोरट्यांच्या घरासमोरून जप्त करण्यात आल्या. परंतु, चोरीसाठी यातील एकाच गाडीचा वापर करण्यात आला. दुसरी गाडी दुसऱ्याची असल्याने नियमानुसार सोडण्यात आली. आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करून शेळ्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडे चोरट्यांची ८ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. परंतु, केवळ दोन दिवसांचा पीसीआर मिळाला. या प्रकरणातील सातवा आरोपी 12 मार्च रोजी नागपूर येथून अटक केली आहे. इतर चोरट्यांचा शोध घेता यावा, याकरिता कोर्टाकडे पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करण्याची प्रकिया सुरू आहे. शेळ्या विक्रीतील ८५ टक्के रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.
श्यामसुंदर सूर्यवंशी
पीएसआय पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे)

न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करणार.
29 फेब्रुवारी रोजी माझ्या शेतातून अंदाजे 6 लाख रुपये किंमतीच्या 51 शेळ्या चोरट्याने लंपास केल्या. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक न करता केवळ 6 आरोपींना अटक केली. शिवाय जप्तीतील एक वाहन सोडून दिले. त्यामुळे ठाणेदार वंदना सोनूले व पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी यांनी आरोपींशी संगनमत करून लाखो रुपये उकळले. येत्या 10 दिवसात मला माझा मुद्देमाल व उर्वरित आरोपींना अटक न केल्यास सिंदी पोलीस स्टेशनसमोर मी आमरण उपोषण करणार.
युगल अवचट
शेतकरी सिंदी (रेल्वे)

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!