यवतमाळ -/ एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सत्तेची मस्ती आणि पैशाच्या जोरावर कायद्याला पायदळी तुडवण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. परसोडा येथील तथाकथित ‘आदर्श’ माजी सरपंच अतुल प्रकाश देशमुख आणि त्याचा भाऊ अमोल प्रकाश देशमुख यांनी एका अपंग पिडितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मात्र, घटना घडूनही राजकीय दबावापोटी आर्णी पोलीस आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत असून, “श्रीमंतांना वेगळा आणि गरिबांना वेगळा कायदा का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
परसोडा ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर राठोड आणि त्यांच्या पत्नीला आरोपी अतुल देशमुख आणि अमोल देशमुख यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर, घरात घुसून पीडित महिलेचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी आर्णी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, तक्रार होऊनही आरोपी उजळ माथ्याने फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपी अतुल देशमुख हा केवळ माजी सरपंच नसून तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आणि जिनिंग प्रेसिंग आर्णीचा संचालक आहे. त्याच्या पाठीशी तगडे राजकीय पाठबळ असल्यानेच पोलीस कारवाई करण्यास धजावत नसल्याची चर्चा तालुक्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका माजी नगराध्यक्षाने पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. ठाणेदार निलेश सुरवडकर यांनी लाच घेऊन आरोपींना अभय दिल्याचा थेट आरोप आता पीडित पक्ष आणि ग्रामस्थांकडून केला जात आहे. ज्या परसोडा ग्रामपंचायतीला ‘आदर्श’ म्हणून नावाजले गेले, त्याच ग्रामपंचायतीच्या नावाखाली या देशमुख बंधूंनी भ्रष्टाचाराचा नंगानाच घातल्याचा आरोप आहे.
बोगस कामे मनरेगा, तांडा वस्ती आणि दलित वस्ती सुधार योजनेत कागदोपत्री बोगस कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा दावा केला जात आहे.
अवैध धंदे आर्णी तालुक्यात सध्या रेती चोरी, मटका, जुगार आणि देहविक्रीसारखे अवैध धंदे फोफावले आहेत.
पीडित महिला अपंग असूनही तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत पोलीस प्रशासन इतके सुस्त का? आरोपींकडे असलेली ‘माया’ ही त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी पुरेशी आहे का? जर सामान्य माणसाने असा गुन्हा केला असता, तर पोलिसांनी आतापर्यंत कोठडीची हवा दाखवली असती. मग या ‘आदर्श’ भ्रष्ट जोडगोळीलाच मोकळे रान का दिले जात आहे?
”आर्णी पोलीस स्टेशनमध्ये सध्या न्यायाचा लिलाव सुरू आहे की काय, असा भास होत आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास परसोडा ग्रामस्थ आणि पीडित परिवार आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.”
(🔥तात्काळ अटक आणि चौकशी व्हावी)
पिडितेचा विनयभंग करणाऱ्या आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या या आरोपींना तात्काळ बेड्या ठोकणे गरजेचे आहे. तसेच, या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, प्रशासनाच्या या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जनतेचा उठाव अटळ आहे.(क्रमशः)