यवतमाळ -/ निसर्गाची लूट, शासनाच्या तिजोरीवर पडलेला कोट्यवधींचा दरोडा आणि गरिबांच्या घामावर उठलेले भांडवलदार हे चित्र सध्या झरी तालुक्यातील अडेगाव परिसरात ‘ईशान मिनरल्स’च्या माध्यमातून उघडपणे पाहायला मिळत आहे. या कंपनीचे मालक राजकुमार अग्रवाल यांनी केवळ खनिज संपत्तीच लुटली नाही, तर शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर ‘डल्ला’ मारला असल्याचा खळबळजनक आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण बेकायदेशीर उद्योगावर जिल्हाधिकारी विकास मीना आणि खनिकर्म अधिकारी संजय जोशी यांनी धारण केलेले ‘अर्थपूर्ण’ मौन बरेच काही सांगून जात आहे.
अडेगावच्या परिसरात जमिनीची छाती फाडून अवैध उत्खनन सुरू आहे. नियमांची पायमल्ली करत बफर झोनमध्ये सुरू असलेल्या या उत्खननामुळे निसर्गाचा ऱ्हास होत असताना, जिल्हा प्रशासनाचे प्रमुख विकास मीना आणि खनिकर्म विभागाचे धनी संजय जोशी यांना हा विनाश दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. ज्यांच्यावर खनिज संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच अधिकारी जर डोळ्यावर पट्टी बांधून बसणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागावा? अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या अडेगावच्या ग्रामस्थांनी मंगळवार, १० फेब्रुवारीपासून शांततापूर्ण मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र, लोकशाही मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्याचा नीच प्रयत्न झरीच्या तहसीलदारांनी केला. उपोषणाला बसलेल्या निष्पाप ग्रामस्थांना मारहाण करून प्रशासनाने आपला क्रूर चेहरा दाखवून दिला आहे. “हक्क मागणाऱ्याला काठी मिळणार असेल, तर हे सरकार कुणाचे?” असा सवाल चिलई, गणेशपूर आणि अडेगावचे शेतकरी आता विचारत आहेत.
ईशान मिनरल्समधून निघणाऱ्या धुळीने परिसरातील शेती उद्ध्वस्त केली आहे. हिरवीगार पिके आता राखेखाली गाडली जात आहेत.थेट पिकांवर बसत असल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. काही शेतकऱ्यांना नावापुरती मदत देऊन तोंडाला पाने पुसली जात आहेत. मात्र, नवनाथ महादेव क्षीरसागर या शेतकऱ्याची व्यथा काळजाला भिडणारी आहे. गेल्या ११-१२ वर्षांपासून या शेतकऱ्याला एक छदामही भरपाई मिळालेली नाही. दरवर्षी ६० हजार रुपयांचे नुकसान सोसणाऱ्या या शेतकऱ्याची ३ लाख ३० हजारांची थकबाकी देण्याची साधी माणुसकीही राजकुमार अग्रवाल यांच्या कंपनीने दाखवलेली नाही.
कंपनीकडून होणाऱ्या ‘डी-वॉटरिंग’मुळे अडेगाव परिसरातील भूजल पातळी खालावली आहे. ८० फुटांच्या खाली पाणी खेचल्यामुळे आजूबाजूच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ग्रामस्थांनी ८० फुटाखालील डी-वॉटरिंग थांबवण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, ज्या जमिनीचे उत्खनन झाले आहे, त्याचे पुनर्भरण न करता कंपनीने तिथे मृत्यूचे सापळे (मोठे खड्डे) उघडे सोडले आहेत.प्रशासकीय अधिकारी भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आता अडेगाव, चिलई आणि गणेशपूरचे नागरिक आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. राजकुमार अग्रवालची मुजोरी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा याविरोधात आता थेट मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस यांची भेट घेतली जाणार आहे.
”आमची जमीन आमची आहे, ती कुण्या अग्रवालच्या बापाची जहागीर नाही. जोपर्यंत हा खाणपट्टा कायमचा बंद होत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.” — संतप्त ग्रामस्थ, अडेगाव
राजकुमार अग्रवाल यांच्यावर अवैध उत्खनन आणि महसूल बुडवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा.
ईशान मिनरल्सचा खाणपट्टा तात्काळ रद्द करा. शेतकरी नवनाथ क्षीरसागर यांना व्याजासह पूर्ण नुकसान भरपाई द्या. प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यावर नियमितपणे पाण्याचे टँकर सुरू करा. ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या तहसीलदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा.
अडेगावचा हा लढा केवळ एका कंपनीविरुद्ध नाही, तर भ्रष्ट व्यवस्था आणि मुजोर भांडवलशाही विरुद्धचा ‘एल्गार’ आहे. जर मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घातले नाही, तर विदर्भातील हा वणवा संपूर्ण राज्यात पसरायला वेळ लागणार नाही. लोकशाहीत जनता जनार्दन असते, हे विसरलेल्या अधिकाऱ्यांनी आता खुर्च्या सांभाळण्याची वेळ आली आहे!