🔥एकाच रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतात चोरी; पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही.
🔥रेहकी–वडगांव परिसरातील शेतकऱ्यांत संताप; मोठ्या प्रमाणात शेती साहित्य लंपास
सेलू -/ तालुक्यातील रेहकी ते वडगांव रस्त्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांवर चोरट्यांनी एकाच रात्री धाड टाकत चार शेतकऱ्यांच्या कोठ्यांची कुलपे फोडून मोठ्या प्रमाणात लोखंडी शेती साहित्य लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरी झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची पोलिसांनी तक्रार घेण्यासही टाळाटाळ केल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहकी येथील अशोक झाडे, अक्षय झाडे व भास्कर मुजबैले तसेच वडगांव येथील सुभाष पिने यांच्या शेतातील कोठ्यांचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडले. कोठ्यांमध्ये ठेवलेले लोखंडी शेती अवजारे व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर उघडकीस आली.
दरम्यान, यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी शेतकरी अक्षय झाडे हे पोलीस ठाण्यात गेले असता तेथील स्टेशन डायरी अंमलदारांनी तक्रार घेण्याऐवजी ‘शेतात १० फूट इकडे-तिकडे चौकशी करा’ असा फुकटचा सल्ला देत त्यांना परत पाठविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरीचा तपास सुरू होण्यापूर्वीच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एकाच रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चोरी झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.