कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम.! वर्ध्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा भावूक सत्कार…

0

🔥कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम.! वर्ध्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा भावूक सत्कार.

 वर्धा -/ पोलीस दलात प्रदीर्घ काळ कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून वयानुसार सेवानिवृत्त झालेल्या दोन अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उत्साही आणि भावूक वातावरणात पार पडला. सेवाकाळातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित सोहळ्यात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अनेकांसाठी भावनिक क्षण ठरला.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नारायण आर. कुंभलवार (ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा) यांचा ३७ वर्षांचा, तर धर्मपाल शंकरराव मानकर (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पुलगांव) यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ उल्लेखनीय ठरला. विविध ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची परंपरा जपली, असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी, “पोलीस सेवा ही अत्यंत आव्हानात्मक असते. कर्तव्य आणि कुटुंबाची सांगड घालत तुम्ही बजावलेली सेवा कौतुकास्पद आहे. दलातील शिस्त व जनसेवेचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेला,” असे सांगून निवृत्त अधिकाऱ्यांना आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, जिल्हा गुन्हे आढावा बैठक असल्याने मुख्यालयात सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपर पोलीस अधीक्षक वाघमारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) पुंडलिक भटकर, जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे वातावरण स्नेहपूर्ण आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावलेले होते.

          सचिन धानकुटे                    साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!