कान्होलीबारा येथे तीन दिवशीय भव्य खुला गट कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न….

0

🔥कान्होलीबारा येथे तीन दिवशीय भव्य खुला गट कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न….

 हिंगणा -/ कान्होलीबारा येथे वीरबजरंग क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ ते १९ जानेवारी २०२६ या ३ दिवसांच्या कालावधीत खुला गट कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती जपण्यासाठी तसेच नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून कबड्डीप्रेमींनी मैदानावर प्रचंड गर्दी करून खेळाडूंना दाद दिली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे, बारामती, नागपूर, वर्धा यासह बाहेरच्या राज्यातून राजस्थान, छत्तीसगड येथील संघांनी सहभाग घेतला. एकूण ३७ कबड्डी संघांनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत चुरशीच्या लढती खेळल्या. प्रत्येक सामन्यात जोश, ताकद, डावपेच आणि संघभावना यांचे दर्शन घडले. विशेष म्हणजे काही सामने शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरले.

पारितोषिकांचा गौरवशाली निकाल

स्पर्धेतील अंतिम फेरी अतिशय उत्कंठावर्धक झाली. उत्कृष्ट खेळ, दमदार बचाव आणि वेगवान चढाया यांच्या जोरावर बारामती कबड्डी संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत प्रथम पारितोषिक ३० हजार रुपये व चषक पटकावला.

तसेच दमदार कामगिरी करत राजस्थान कबड्डी संघाने द्वितीय पारितोषिक २० हजार रुपये व चषक मिळवला.
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत शिर्डी कबड्डी संघाने तृतीय पारितोषिक १५ हजार रुपये व चषक पटकावला,
तर शिवगर्जना वर्धा कबड्डी संघाने चतुर्थ पारितोषिक १० हजार रुपये व चषक मिळवून मान पटकावला.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजयी संघांचे अभिनंदन करण्यात आले तसेच उत्कृष्ट खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे परिसरातील तरुणांमध्ये खेळाविषयी उत्साह वाढला असून गावातील क्रीडा वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे योगदान
ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वीरबजरंग क्रीडा मंडळाचे गुड्डू गव्हाळे, सचिन गोहणे, रणजीत ताटे, विनायक कोहळे, कुणाल आंबुलकर, प्रवीण धोडरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच गावातील कबड्डीप्रेमी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहकार्य करत आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.कान्होलीबारा सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या भव्य स्पर्धा झाल्याने तरुणांना प्रेरणा मिळते, खेळाडूंना संधी मिळते आणि गावाची ओळख राज्यस्तरावर वाढते अशी भावना उपस्थित प्रेक्षकांमध्ये दिसून आली.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!