कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण कायदा
प्रतिनिधी/वर्धा
कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ कायदा अधिनियम 2013 च्या वर्धापण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे कायदयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यातआले होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, तहसिलदार प्रिया कावळे, विधी सल्लागार छाया मेहरे आदी उपस्थित होते.म हिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबध्द असून महिलांनी त्यांच्यावर होणा-या अत्याचाराविरोधात वेळीच समितीकडे दाद मागावी व सदर कायद्याबाबत महिलांनी जागरुक राहावे, असे आवाहन अर्चना मोरे यांनी केले.
ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत. किंवा जेथे नियुक्ती प्राधिका-यांकडून तक्रारी आहेत. अशा कार्यालयातील लैंगिक छळाच्या तक्रारी स्थानिक तक्रार समितीकडे कराव्यात व ज्यांच्या आस्थापनेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करुन लैंगिक छळाच्या तक्रारी अंतर्गत तक्रार समितीकडे सादर कराव्यात असे प्रशांत विधाते यांनी सांगितले.
सदर कायदयासंदर्भात व अंतर्गत तक्रार समिती व स्थानिक तक्रार समिती मध्ये तक्रार प्राप्त झाल्यानंतर करावी लागणारी चौकशीची कार्यपध्दती संदर्भात छाया मेहरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महसूल विभागातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.