🔥शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिनव आंदोलन.
सिंदी (रेल्वे) -/ सेलडोह-सिंदी-कांढळी या राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदाराने अर्धवट रस्त्याचे बांधकाम केल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तेथे पाण्याचे डबके तयार झाले. खड्ड्यातून, पाण्यातूनच वाहने चालवावी लागत असल्याने हाडे खिळखिळी होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचा निषेध नोंदवीत खड्ड्यात लावले बेशरमचे झाड.
सिंदी-सेलडोह-कांढळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 (आय) असून या रस्त्याचे बांधकाम मागील अंदाजे 10 वर्षांपासून सुरू आहे. सदर रस्त्याचे बांधकाम केदारेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, मुंबई यांना दिले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग, विभाग नागपूर व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावर 12 ठिकाणी अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचत असल्याने या रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे. पाण्यातूनच रस्ता शोधत वाहनधारकांना ये-जा करावी लागते. खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने काही वाहनधारक खड्ड्यातच पडल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.
सेलडोह-सिंदी या महामार्गावर समृद्धी महामार्ग असल्याने या मार्गाने नेहमी लहान-मोठ्या वाहनांसह वाळू व गिट्टी भरलेल्या जड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अर्धवट सोडलेल्या रस्त्याची चाळणी झालेली आहे. रस्त्याची दुरवस्था होऊनही राष्ट्रीय महामार्ग, नागपूर विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. पंचक्रोशीतील ऐतिहासिक सुप्रसिद्ध सिंदी शहरातील तान्हापोळा 2 व 3 सप्टेंबर रोजी असल्याने दरवर्षी विदर्भातून याठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. रस्त्यावर जागोजागी चिखल साचून मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी चार दिवसाच्या आत रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच या मतदार संघातील कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांना खड्डेसम्राट असे संभोदून राष्ट्रवादी पक्षाकडून नारे देत निषेध नोंदवला. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळी तुषार हिंगणेकर युवा सिंदी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श.प.गट, सचिव धनराज झिलपे, फिरोज बेरा, प्रभाकर कलोडे, रवी राणा, जगदीश बोरकर, युगल अवचट, बंटी बेलखोडे, सुनील शेंडे, राजु कोपरकर, राजु दांडेकर, विशाल चिंचुलकर, राजु कातोरे, सुभाष डांगरे, राजू दांडेकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.