आर्वी -/येथे सोमवार,9 सप्टेंबर 2024 रोजी कृषक इंग्लिश (मीडी) प्रायमरी स्कूल,आर्वी या शाळेमध्ये आजी आजोबा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला.या कार्यक्रमाचे आयोजन वर्ग एक ते चार च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमाला जवळजवळ 300 आजी आजी आजोबा उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या बँड पथकाने सन्मानाने सर्व आजी-आजोबांना शाळेमध्ये आणले.त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी नात्यांचे बंध उलगडणारी नाटिका सादर केली,ज्यामध्ये आजी-आजोबांचे आपल्या जीवनातील अढळ स्थान अधोरेखित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी नृत्य सादर केले यामध्ये हे सांगितले गेले होते की आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती या देवा समान असतात. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे त्यांच्या जीवनातील महत्त्व याविषयी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजी-आजोबांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले व चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आजी आजोबा अगदी भाऊक झाले होते. आजी आजोबांसाठी छोटे छोटे खेळ सुद्धा आयोजित करण्यात आले होते ज्यात त्यांनी अतिशय उत्साहाने व आनंदाने भाग घेतला. या खेळांमधील विजेत्यांना पारितोषिके सुद्धा देण्यात आली. आम्हाला आमचे बालपण आठविले असे प्रतिपादन आजी-आजोबांनी केले.काही आजी आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी वातावरण हळवे झाले होते. आजकाल नवीन पिढीला सासू-सासरे, आजी आजोबा जड झाले आहेत. त्यांना त्यांच्यामध्ये म्हातारे लोक नको असतात. परंतु आजी आजोबांचा जीव आपल्या नातवंडांसाठी झुरत असतो. प्रत्येकालाच आयुष्याच्या या जीवनचक्र मधून जायचे आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे ही अपेक्षा आजी-आजोबांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषक व भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई काळे, चंद्रसिंगजी चोरडिया, सौ. निर्मलाजी चोरडिया व निवृत्त मुख्याध्यापिका निर्मलाताई हिवसे उपस्थित होत्या. शोभाताई काळेंनी आपल्या मार्गदर्शनात आजी-आजोबांचे नातवंडांना संस्कारक्षम बनविण्यासाठी घरात असणे किती महत्त्वाचे असते यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम अगदी हसत खेळत आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला. आजी-आजोबांनी शाळेने त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय डोळस, पर्यवेक्षिका सौ. अर्चना पाटील, ईश्वरी बुरे, सौ. विशाखा पायले, मोनाली भुयार, सौ. रोशनी मावळे, सौ. स्वीटी मनवर, नुझत शेख, सौ. भारती जमालपुरे, सौ. सुषमा भोंबे, शबनम शेख, गौरव केवट, सौ. हिमाली कट्टा, भाग्यश्री खेकाळे, सनी हजारे, सौरभ लवटे,पंकज पोटे यांनी परिश्रम घेतले.