केदारेश्वर मंदिर प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करा…विधानसभा उपाध्यक्षांचे अधिका-यांना निर्देश….

0

🔥केदारेश्वर मंदिर प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करा…विधानसभा उपाध्यक्षांचे अधिका-यांना निर्देश.

यवतमाळ -/ शहरातील प्राचीन केदारेश्वर मंदिरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीत विधी व न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुरातत्त्व विभाग तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तक्रारदार अमोल कोमावार यांनी केदारेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन असून मंदिर परिसरात नव्याने आलेल्या ट्रस्टींकडून विनापरवानगी बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच मंदिर परिसरातील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे कुंड बुजविणे, मुख्य शिवलिंगाच्या आतमध्ये बदल करणे आणि दुर्मिळ जलचर प्राण्यांची तस्करी केल्याचाही आरोप केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाबाबत गेल्या तीन वर्षांपासून विविध विभागांकडे तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मंदिराच्या ट्रस्टींवर गंभीर आरोप करण्यात आले असून मंदिर परिसरात कॉम्प्लेक्स उभारून जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा करण्यात आला. बैठकीत धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिराची स्थापना सन १९६३ मध्ये झाली असून १९६४ ते २०१६ पर्यंतचे ऑडिट नोंदी कार्यालयात उपलब्ध आहेत. २०१७ ते २०२२ या कालावधीतील ऑडिट ऑनलाईन स्वरूपात नोंदविण्यात आले आहे. ट्रस्टच्या जमिनीच्या व्यवहारांसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र सध्या उल्लेख करण्यात आलेल्या काही जमिनींच्या व्यवहाराची नोंद कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची माहितीही देण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिर परिसरात झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत ट्रस्टला नोटीस देण्यात आली आहे. तसेच या बांधकामाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. बैठकीत सर्व विभागांकडून सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल,असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे पुढच्या बैठकीत महसूल विभागाचे अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना उपाध्यक्षांनी दिल्या आहेत.

🔥फौजदारी गुन्हे दाखल करा.

केदारेश्वर मंदिर अवैध बांधकाम प्रकरणी पुरातत्व विभागाच्या नियमांचा भंग करण्यात आला आहे. पंधराशे वर्ष जुने पुरातण कुंड बुजवून संरचनेत बदल करण्यात आले. हा सर्व प्रकार भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार असून ट्रस्ट मधील सर्व पदाधिका-यांवर पुरातत्व विभागाच्या कायद्यानुसार तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.

               ब्युरो रिपोर्ट                        साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!