🔥केळझर–दहेगांव रस्त्याची अक्षरशः चाळण.! खदानीच्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक हैराण.🔥रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; पिकांचे नुकसान – निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा.
सेलू -/ तालुक्यातील केळझर–दहेगांव या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून मौजा किन्हाळा येथील खदानीमधून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. धुळीच्या प्रचंड लोटामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
हा मार्ग दहेगांव गोसावी, किन्हाळा, आजनगांव, खापरी ढोणे, तुळजापूर, बोन्डसुला, जुनोना, चिंचोली, उत्तमपूर, हेलोडी, बेलोडी, गणेशपूर, हिवरा, बोरगांव, धपकी आदी अनेक गावांसाठी मुख्य रहदारीचा मार्ग आहे. मात्र खदानीमधून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण मार्ग धुळीने व्यापला आहे.
रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रक-डंपरमुळे उडणारी धूळ थेट शेतांमध्ये जाऊन पिकांवर साचत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येमुळे शेतकरी अक्षरशः बेजार झाले असून संबंधित खदानीमुळे हा त्रास नेहमीचाच झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, खदानीच्या मालकांकडून अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मात्र या प्रकाराकडे शासन-प्रशासनाने जणू डोळेझाक केल्याची टीका ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास सार्वजनिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
तसेच संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने खदानीसाठी दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात पीडित ग्रामस्थांनी ता.६ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खदानीच्या अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.