कोरोनामुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांना
प्रतिनिधी / वर्धा :
कोरोना संसर्गामुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्यावतीने मदत दिली जाते. जिल्ह्यातील पालक गमावलेल्या अशा बालकांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयांच्या मुदतठेवी प्रमाणपत्राचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.निशांत परमा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आस्टिकर, कल्याणकुमार रामटेके, रमेश दडमल, समीर बेटावडकर उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागाने कोरोना संसर्गामुळे दोनही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे एकरकमी रुपये ५ लक्ष इतकी रक्कम मुदत ठेव स्वरूपात संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सामायिक खाते उघडणात आले असून रुपये पाच लक्ष इतकी रक्कम सामायिक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
त्यानुसार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते मुलांना अनाथ प्रमाणपत्र व मुदतठेव प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री श्री.केदार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी केले.