गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याने पुजाऱ्यावर सूड उगविण्याचा प्रयत्न घर पाडण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून दिली नोटीस.

0

🔥गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याने पुजाऱ्यावर सूड उगविण्याचा प्रयत्न,घर पाडण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून दिली नोटीस.

 यवतमाळ-/ यवतमाळ येथील केदारेश्वर महादेव मंदिरातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे मंदिराचे सचिव राजेश राव आता पुजाऱ्यावर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून गिरी परिवाराला महादेव मंदिर परिसरात राहत असलेले घर काढून टाकण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. आठ पिढ्यापासून या मंदिरात पुजारी म्हणून काम करीत असताना नेमकी आताच नोटीस कशी आली असा प्रश्न मंदिर परिसरात राहणाऱ्या पुजारी श्रीमती रूपा गिरी यांनी उपस्थित केला आहे.

श्रीमती रूपा प्रमोद गिरी यांच्या परिवाराचे आठ पिढ्यापासून महादेव मंदिर परिसरातील घरात वास्तव्य आहे. मंदिराच्या मालमत्ता पत्रकात सुद्धा त्यांच्या नावाची नोंद आहे. केदारेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्यामुळे त्यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. केदारेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात बिना परवानगी अवैध बांधकाम करण्यात आल्यामुळे अमोल कोमावार यांनी सुद्धा पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या आहे. या तक्रारीची दखल घेत दोन वर्षांपूर्वीच पुरातत्व विभागाने पाहणी करून हे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहे. या मंदिरात असलेले दीड हजार वर्षे जुने पुरातन कुंड सुद्धा बुजवून टाकण्यात आले. या कुंडातील जवळपास 100 कासव कुठे गेले याचा पत्ता लागलेला नाही. पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेताच तोडफोड करण्यात आली. त्यामुळेच तक्रारीची दखल घेत पुरातत्व विभागाने पाहणी करून अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले, मात्र जिल्हा प्रशासनाने या आदेशाची दखल घेतली नाही. त्यामुळे सदर प्रकरण आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री दरम्यान केदारेश्वर मंदिराचे सचिव राजेश राव यांनी स्वतःचा क्यूआर कोड मंदिर परिसरात लावून भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करून घेतल्या. याबाबत सुद्धा धर्मदाय आयुक्ताकडे कारवाईसाठी तक्रार करण्यात आली आहे. आठ दिवस पूर्वीच शासनाच्या जमिनीवरील गौण खनिज जेसीबी तसेच चार टिप्परच्या माध्यमातून चोरून नेण्यात आले. या प्रकरणात सुद्धा यवतमाळच्या तहसीलदारांनी राजेश राव यांना सोमवारी बोलाविले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वृत्तपत्रांना दिली होती. मात्र नंतर स्थळ पंचनाम्यातून राजेश राव यांचे नाव वगळण्यात आले. सदर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत केदारेश्वर मंदिरात सचिव राजेश राव यांच्याविरुद्ध आवाज उठवत असल्यामुळेच तसेच अमोल कोमावार यांना माहिती देत असल्याच्या संशयावरून नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला घर पाडण्यासंदर्भात नोटीस दिल्याचा आरोप गिरी परिवाराने केला आहे.

🔥इशारा देण्याचा प्रयत्न.

केदारेश्वर मंदिरापासून वाहणारा नाला खूप दुरून वाहत येतो. शहराच्या मध्यभागातून वाहत जाणाऱ्या या नाल्याच्या बाजूला शंभर वर्षापासून अनेकांची घरे आहेत. या घरांचा नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला कुठेही अडथळा होत नाही. केदारेश्वर मंदिराच्या समोरच याच नाल्यावर पंचवीस वर्षापासून वगारे आर्ट गॅलरी आहे. गिरी यांचा परिवार आठ पिढ्यापासून याच ठिकाणी राहत असताना नेमके याच वेळेवर त्यांना नोटीस देण्यात आली आहे. नोटीसवर तक्रार कर्ता म्हणून पहिले राजेश राव यांचे नाव लिहिले होते मग ते अस्पष्टपणे खोडून त्यावर शुभम चव्हाण यांचे नाव लिहिण्यात आले. हा सर्व प्रकार तक्रार कराल तर तुमचे हाल करू असा संदेश देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप गिरी परिवाराने केला आहे.

🔥बंदूक रोखल्याची तक्रार प्रलंबित.

दोन वर्षांपूर्वी मध्यरात्री केदारेश्वर मंदिर परिसरात खोदकाम केले जात होते. या खोदकामाला विरोध केल्यामुळे राजेश राव यांनी आपल्यावर बंदूक रोखली असा आरोप रूपा गिरी यांनी करून यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीवर अजूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी आमचे घर मोकळे करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गिरी परिवाराने केला आहे.

                  ब्युरो रिपोर्ट                       साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!