गैरव्यवहाराची चौकशी झाली नसतांना निवडणूक कशी घेता-वाघमारे
प्रतिनिधी/ सिंदी (रेल्वे)
स्थानिक खरेदी विक्री सहकारी संस्थेची होऊ घातलेली निवडणूक वादात सापडली आहे. संस्थेचे माजी सभापती सुधाकर वाघमारे यांनी जिल्हा निबंधकाकडे लेखी तक्रार सोमवारी केली आहे. या संस्थेच्या मागील 10 वर्षीच्या कार्यकाळात झालेल्या अनेक नियमबाह्य कामकाज आणि आर्थिक व्यवहारावर दरवर्षी लेखापरीक्षण अहवालात गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे. परंतु, निबंधक कार्यालयाने त्या प्रकरणी ठोस भूमिका घेतली नाही म्हणून सदर निवडणूक अविलंब थांबविण्यात यावी अशी विनंती त्या निवेदनातून वाघमारे यांनी केली आहे.
येथील सहकारी संस्थेची निवडणूक 7 डिसेंम्बर ला सहायक निबंधक पोथारे यांनी एका आदिसुचनेद्वारे घोषित केली. परंतु, मागील 10-11 वर्षीच्या कालावधीत बऱ्याच प्रमाणात संस्थेमध्ये गैरव्यवहार झालेत. त्या संदर्भात उपसभापती वाघमारे यांनी वेळोवेळी हरकती नोंदविल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी लेखापरिक्षकांनी केलेल्या लेखी अहवालाचा देखील पाठपुरावा केला. संस्थेमध्ये कार्यरत रोखपाल प्रदीप बोंबले आणि मोहम्मद पठाण यांनी लाखो रुपयांची रोख रक्कम स्वतः जवळ बाळगली. लोकड पुस्तिकेत प्रत्येक पानावर खोडतोड करून दडपलेली रक्कम दिसून आली असेही लेखापरीक्षक बन्सोड यांनी अहवालात नमूद केले होते, याकडे तत्कालीन सभापती आशिष देवतळे व व्यवस्थापन समितीचे लक्ष वेधले होते. सर्वाधिक आश्रयाची बाब म्हणजे सभापती आशिष देवतळे यांनी सुमारे 80 हजार रुपये स्वतः वापरल्याचे अंकेशन अहवालात स्पस्ट दिसत आहे असा दावा सुधाकर वाघमारे यांनी केला आहे. सहायक निबंधक सेलू व जिल्हा उपनिबंधक वर्धा यांनी वारंवार पत्रव्यवहार केला पण, आशिष देवतळे यांनी 80 हजार रुपये संस्थेकडे जमा केली नाही. या संस्थेमध्ये एकेकाळी 34 कर्मचारी व अधिकारी सेवारत होते. परंतु, एकाही कर्मचाऱ्यांकडे संस्थेचे नियुक्ती पत्र उपलब्ध नाही. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका तयार करण्यात आली नाही. एकाही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे नियुक्ती पत्र नसतांना त्यांची कशाच्या आधारे नक्की करण्यात आली हे एक कोडेच आहे. संस्थेमधून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या चार कर्मचाऱ्यांना सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक यांची लेखी परवानगी न घेता परत मानधनावर सेवेत ठेवण्यात आले आहे. या नियमबाह्य व्यवहारात खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर निवडणूक घेऊन सहकार क्षेत्रातील सर्व अधिकारी आणि जुने जाणते नेते लाखो रुपयांचा गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामकाजाला मूठमाती देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप 13 डिसेंम्बर ला दिलेल्या लेखी तक्रारीतून सुधाकर वाघमारे यांनी केला आहे. काल निवडणूक व निर्णय अधिकाऱ्यांपुढे सादर केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये अनेक भ्रष्ट माजी संचालक आणि एका कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे हे येथे उल्लेखनीय ! येत्या 29 तारखेला प्राप्त झालेल्या उमेदवारांचे भविष्य ठरविल्या जाणार असून दोन गटात आपशी तडजोड होऊन अविरोध निवडून आलेले संचालक पुन्हा उजळ माथ्याने गैरव्यवहार करणार नाही याचा काय भरवसा ? असा सवाल देखील वाघमारे यांच्या आरोपामुळे उपस्थित झाला आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकाने वेळोवेळी सादर केलेल्या लेखापरीक्षणाचे किंवा विशेष अंकेशन यांच्या अहवालाचे वाचन केले नाही काय असा प्रश्न या अनुषंगाने चर्चेला आला आहे.
*34 उमेदवारी अर्ज सादर*
सोमवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 34 अर्ज प्राप्त झालेत, असे निवडणूक अधिकारी पोथारे यांनी सांगितले. त्यात आशिष देवतळे गटाकडून भ्रष्टाचार्य माजी कर्मचारी प्रदीप बोंबले, वामन ढोक, प्रदीप उर्फ बाबा झाडे यांचा समावेश आहे, हे विशेष !