घरफोडीत १४ तोळे सोने व ३ लाखांची रोकड लंपास; हिंगणघाट शहरात चोरीचे प्रमाण वाडले….

0

🔥घरफोडीत १४ तोळे सोने व ३ लाखांची रोकड लंपास; हिंगणघाट शहरात चोरीचे प्रमाण वाडले.

हिंगणघाट -/शहरातील मारोती वार्ड परिसरातील अब्दुल्लानगर येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. येथील दंतवैद्य डॉ. संदीप मुडे यांच्या निवासस्थानातून चोरट्यांनी सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाख रुपये रोख व चांदीचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, डॉ. संदीप मुडे व त्यांची पत्नी, त्या देखील दंतवैद्य, शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी सुमारे ४ वाजता कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. घर कुलूपबंद असताना रविवारी सकाळी सुमारे ८ वाजता घरकामासाठी आलेल्या मोलकरणीला मुख्य दरवाज्याजवळील लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडलेले आढळून आले. तिने तत्काळ शेजाऱ्यांना व डॉ. मुडे यांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच डॉ. मुडे दाम्पत्य हिंगणघाट येथे दाखल झाले. घराची पाहणी केली असता बेडरूममधील आलमारी फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्धा येथील ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासही पाचारण करण्यात आले; मात्र श्वान पथकाला ठोस सुगावा लागला नाही.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार घरफोडीत सुमारे १४ तोळे सोने, ३ लाख रुपये रोख व चांदीचा ऐवज चोरीस गेला आहे. पोलिसांच्या प्राथमिक नोंदीत १३ तोळे सोने व ३ लाख रुपये रोख चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. आजच्या बाजारभावानुसार १४ तोळे सोन्याची किंमत सुमारे १८ लाख २० हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, घरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही चोरट्यांनी सोबत नेल्याने हे चोरटे सराईत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही घरफोडी रविवारी मध्यरात्री ३ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरात आमदार निधीतून लाखो रुपये खर्च करून मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचा फायदा चोरटे व अवैध धंदे करणारे घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!