जिल्हा कारागृहातील 60 बंदींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

0

 

प्रतिनिधी / वर्धा :

जिल्हा कारागृहात वेगवेगळया आरोपाचे अनेक बंदी असतात. त्यात काही बंदी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले तर बहुतांश बंदी हे अंडरट्रायल असतात. अशा बंदींना कारागृहातून सुटका झाल्यानंतर कुंटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत 60 बंदींना वेगवेगळया प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत आज या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारागृह अधिक्षक सुहास पवार, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकासचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदिप घुले, संघमित्रा शेळके, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डोंगरे, प्लॅटीनम कॉम्पुटर इन्स्टीटयूटचे संचालक अजित नेरकर, रहेमान शेख, एम्स संस्थेचे संचालक स्नेहल मानकर, पंकज मानेकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाचे वतीने कुशल व रोजगारयुक्त महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारीत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातही या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. कार्यक्रमा अंतर्गत युवकांना कौशल्य विकास तसेच वेगवेगळया प्रकारचे स्वयंम रोजगाराभिमुख  प्रशिक्षण दिल्या जाते. कारागृहात अनेक कैदी हे अंडरट्रायल असतात.  अशा कैद्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वंयम रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केवळ कैद्यांसाठी स्वतंत्र कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते.
जिल्हाधिका-यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेतून सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 60 कैद्यांना प्रत्येकी 30 च्या दोन गटामध्ये प्रशिक्षण दिले जातील. प्रशिक्षणामध्ये सेल्फ एम्प्लॉईड टेलर व डोमॅस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण उद्योजकता विकास केंद तर वेल्डींग व ईलेक्ट्रीकचे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिले जातील. सदर प्रशिक्षण प्रत्येकी तीन महिन्याचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बंदींशी संवाद साधला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कुंटूबांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा असे सांगितले. अन्य प्रकारचे प्रशिक्षण हवे असल्यास तशा प्रशिक्षणाची मागणी करा, अशीही जिल्हाधिका-यांनी संवाद साधतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!