🔥जिल्ह्यातील पोलीस शिपाईचा सामाजिक भानाचा स्तुत्य उपक्रम,आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थी घेतला दत्तक!
सेलू -/ शिक्षण हेच खरं संपत्ती आहे” या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत भूषण राजेंद्र भोयर, हे आर्वी येथील कार्यरत पोलीस शिपाई,यांनी आपल्या शाळेतील एका गरजू व होतकरू विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे.ही गोष्ट केवळ आर्थिक मदतपुरती मर्यादित नसून,त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक भविष्यासाठीचा एक सामाजिक व संवेदनशील निर्धार आहे.भूषण राजेंद्र भोयर हे यशवंत विद्यालय येळाकेळी या शाळेतून शिक्षण घेऊन पुढे पोलीस दलात भरती झाले. त्यांना आजही आपल्या त्या शाळेच्या आठवणी ताज्या आहेत. “या शाळेने मला घडवलं. आता वेळ आहे काहीतरी परत देण्याची,” असे म्हणत त्यांनी आपल्या मूळ गावातीलच शाळेत शिकणाऱ्या एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्याची जबाबदारी स्वीकारली.दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य, गणवेश, फी, आणि आवश्यक ते सर्व सहाय्य भूषण राजेंद्र भोयर हे स्वतः करणार आहेत. याबरोबरच वेळोवेळी मार्गदर्शन, मानसिक आधार आणि करिअरसंदर्भात सल्लाही ते देणार आहेत.शाळेचे मुख्याध्यापक वनिता चलाख म्हणाल्या,”ही कृती केवळ आर्थिक मदत नाही, तर समाजासाठी एक आदर्श आहे. अशा उपक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळेल.”गावात सर्वत्र या सामाजिक कार्याचं कौतुक होत असून, अनेक जण भूषण राजेंद्र भोयर यांच्या या पावलाला “नव्या समाज परिवर्तनाची सुरुवात” मानत आहेत.या कार्यासाठी श्याम वानखेडे यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. ते म्हणाले की अशा संवेदनशील कृतींची समाजाला आज नितांत गरज आहे.भूषण राजेंद्र भोयर यांच्यासारख्या पोलिसाकडून समाजाला खऱ्या अर्थानं सुरक्षा आणि सशक्तीकरण दोन्ही मिळत आहे.