🔥नियमांची पायमल्ली करत ‘डोलामाईट’ची क्रेशर स्टोनच्या नावाने तस्करी.
यवतमाळ -/ एकीकडे शासन महसूल वाढवण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथे ‘इशांत मिनरल्स’च्या माध्यमातून निसर्गसंपत्तीची भयानक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या २५ वर्षांपासून या खाणीची इटीएस (Electronic Total Station) मोजणी झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च प्रतीचा ‘डोलामाईट’ काढून तो क्रेशर स्टोन (गिट्टी) असल्याचे भासवून शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधींचा दरोडा टाकला जात आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये नागपूरचे खाण मालक अग्रवाल आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे. नियमानुसार, कोणत्याही खाणपट्ट्याची दर दोन वर्षांनी तहसीलदार आणि भूविज्ञान व खनिकर्म विभागामार्फत इटीएस मोजणी करणे बंधनकारक असते. मात्र, अडेगावच्या इशांत मिनरल्सबाबत हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. गेल्या अडीच दशकांपासून येथे मोजणी झालेली नाही. अग्रवाल नावाच्या या खाण मालकाने आपल्या पैशाच्या जोरावर आणि दहशतीने तपासणी यंत्रणांना आपल्या खिशात ठेवले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
इशांत मिनरल्सच्या खाणीतून निघणारा दगड हा साधी गिट्टी नसून उच्च दर्जाचा डोलामाईट आहे. हा मौल्यवान दगड वणी तालुक्यातील राजूर येथील चुनाभट्ट्यांना मोठ्या प्रमाणावर पुरवला जातो. तेथे या दगडावर प्रक्रिया करून तो चुना म्हणून महागड्या दराने विकला जातो. डोलामाईट उत्खननासाठी विशेष परवानगी आणि जास्त रॉयल्टी भरणे आवश्यक असते. मात्र, महसूल विभागाला हाताशी धरून हा मौल्यवान खनिज साठा ‘क्रेशर स्टोन’ म्हणून दाखवला जात आहे, ज्यामुळे शासनाचा दरवर्षी कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
या संपूर्ण प्रकरणात खनिकर्म अधिकारी संजय जोशी यांचे नाव चर्चेत आले आहे. “मी असेपर्यंत तुझे कोणीही वाकडे करू शकणार नाही,” असे आश्वासन जोशी यांनी खाण मालक अग्रवालला दिल्याची चर्चा खाण परिसरात रंगली आहे. इतकेच नव्हे तर, जिल्हाधिकारी विकास मीना यांना देखील या प्रकरणाची दिशाभूल करणारी चुकीची माहिती पुरवली जात असल्याचे समजते. नागपूर खनिकर्म विभागातील एका बड्या अधिकाऱ्याला मोठी रक्कम देऊन ही जमीन खरेदी करण्यात आली आणि आता ती संपूर्ण पोखरून काढली जात आहे.
खाणीमध्ये रात्रंदिवस होणाऱ्या भीषण ब्लास्टिंगमुळे अडेगाव परिसर हादरून गेला आहे. धुळीचे लोट आणि आवाजाच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक दरवर्षी तपासणीसाठी येते, मात्र खाण मालकाकडून त्यांची ‘शाही’ बडदास्त ठेवली जाते. रोकड आणि इतर प्रलोभनांमुळे हे पथक डोळे झाकून परत जाते. आजपर्यंत या खाणीला प्रदूषणाबाबत साधी नोटीस देण्याची तसदीही या विभागाने घेतलेली नाही.
अडेगावच्या या खाणीमुळे गावातील रस्ते खराब झाले असून, प्रदूषणा मुळे श्वसनाचे आजार बळावले आहेत. रॉयल्टीच्या बाबतीतही मोठा घोळ सुरू असून, एकाच रॉयल्टी पासवर वर्षानुवर्षे वाहतूक सुरू असल्याचे बोलले जाते. आता गावातील संतप्त नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे.
🔥ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: १. इशांत मिनरल्सची तातडीने इटीएस मोजणी करण्यात यावी. २. डोलामाईट चोरीचा हिशोब लावून खाण मालकावर गुन्हे दाखल करावेत. ३. भ्रष्ट अधिकारी संजय जोशी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. ४. गावातील प्रदूषण थांबवण्यासाठी खाण कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. झरी जामणीचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन ‘खनिज माफियांना’ चाप लावणार का? की पुन्हा पैशाच्या जोरावर हे पाप दाबले जाणार? याकडेसंपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.