झरी पंचायत समिती भ्रष्टाचाराचा ‘सैराट’ आखाडा बीडिओ सागळेंचा मनमानी कारभार अन् मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ अभय!…..

0

     🔥हेच ते बीडिओ रवींद्र कुमार सगळे चे “आकां” जि.प. यवतमाळ चे सीईओ (CEO) मंदार पत्की.🔥हेच ते झरी चे बीडीओ रवींद्र कुमार सगळे, नियमबाह्य पद्धतीने कामे करून १० टक्के कमिशन लाटून झाले “सैराट”

🔥झरी पंचायत समिती भ्रष्टाचाराचा ‘सैराट’ आखाडा
बीडिओ सागळेंचा मनमानी कारभार अन् मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ अभय!

​यवतमाळ -/ झरी पंचायत समिती सध्या विकासासाठी नाही, तर भ्रष्टाचाराच्या महाजालासाठी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. येथील गटविकास अधिकारी (BDO) रवींद्र कुमार सागळे यांनी नियम धाब्यावर बसवून भ्रष्टाचाराचा जो ‘सैराट’ धुमाकूळ घातला आहे, त्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे मूक संमतीवजा पाठबळ मिळत असल्याचा खळबळजनक आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. दुर्गम भागातील जनतेचा हक्काचा पैसा अधिकारी आणि दलालांच्या खिशात जात असून, झरी पंचायत समिती म्हणजे सेवा केंद्र नसून भ्रष्टाचाराचा ‘धंदा’ बनला आहे. ​प्राथमिक शाळांमधील स्वच्छतेसाठी आलेल्या ४३ + १६ शौचालयांच्या निधीवर डल्ला मारण्याचे नियोजन पद्धतशीरपणे करण्यात आले. दोन ते तीन कोटींच्या या कामात निविदा प्रक्रियेचा अक्षरशः पोरखेळ करण्यात आला. मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी निविदा ‘मॅनेज’ करण्यात आल्या आणि त्यातून १० टक्क्यांहून अधिक रक्कमेचा आर्थिक अपहार झाल्याची माहिती समोर येत आहे. पारदर्शकता केवळ कागदावर असून प्रत्यक्षात टक्केवारीच्या गणिताने ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ​एकीकडे पंचायत समितीच्या कार्यालयाची अवस्था दयनीय आहे, तर दुसरीकडे बीडिओ रवींद्र कुमार सागळे यांनी स्वतःच्या शासकीय निवासस्थानावर गेल्या तीन वर्षांत लाखो रुपयांची उधळण केली आहे.
​कार्यालयाची दुरवस्था: मुख्य कार्यालयाकडे जाणाऱ्या १०० मीटर रस्त्याची साधी डागडुजी नाही. कार्यालयातील फर्शी उखडलेली असून दिव्यांगांना चालणेही कठीण झाले आहे. बसण्यासाठी धड खुर्च्या नाहीत आणि स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
​निवासस्थानाचे ‘नंदनवन’: कार्यालयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सागळे यांनी ‘ऑफलाईन रेट लिस्ट’चे छोटे छोटे एस्टिमेट्स बनवून स्वतःचे निवासस्थान मात्र सुसज्ज केले आहे. या आलिशान दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचा किती निधी हडप केला, याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. ​लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत ‘प्रशासक’ म्हणून काम पाहताना सागळे यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. झरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्याने सर्व अधिकार हातात असलेल्या बीडिओनी ‘जॅम पोर्टल’ चा नावापुरता वापर केला. गावागावातील जलशुद्धीकरण केंद्रे, अंगणवाड्या, सौर ऊर्जा (LED) लाईट, हायमास्ट लाईट आणि अग्निशमन साहित्य पुरवठ्याच्या कामात कागदोपत्री खर्च दाखवून लाखो रुपये लंपास करण्यात आले. ही सर्व कामे ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय मान्यता देऊन मर्जीतील ‘अभिकर्ता’ (एजंट) मार्फत करण्यात आली.
​​झरी तालुक्यातील उपसरपंच, माजी पदाधिकारी आणि जागृत नागरिकांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई का होत नाही? याचे उत्तर पंचायत समितीच्या अंतर्गत यंत्रणेत दडलेले आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) कैलास जाधव हे बीडिओ सागळे यांचे ‘खास अभिकर्ता’ म्हणून कार्यरत असल्याचा आरोप आहे. तक्रार करणाऱ्या ग्रामसेवकांना ‘मॅनेज’ करणे किंवा तक्रारींच्या फाईली दाबून टाकण्याचे काम येथील यंत्रणा चोख बजावत आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास उडत चालला आहे. ​सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्याकडे अनेक तक्रारी जाऊनही त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. “भ्रष्ट सागळे यांना सीईओंचे अभय आहे,” अशी चर्चा आता गावकुसापर्यंत पोहोचली आहे. या अपहाराच्या रक्कमेत वरिष्ठ अधिकारीही ‘वाटेकरी’ आहेत की काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सीईओ पत्की एकीकडे जिल्ह्यात दौरे करत असताना, झरीमधील घरकुल वंचितांच्या समस्या आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.
​​झरी हा भाग आंध्र प्रदेश आणि चंद्रपूरच्या सीमेला लागून असलेला अत्यंत दुर्गम भाग आहे. येथील आदिवासी आणि गोरगरीब जनतेच्या विकासाचा पैसा अशा प्रकारे लुटला जात असेल, तर ही गंभीर बाब आहे.
​खनीकर्म निधी, सेस फंड आणि जिल्हा वार्षिक योजनेतील सन २०२३ ते २०२५ मधील सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.
​ऑनलाईन निविदा किती आणि ऑफलाईन किती? याचे ऑडिट होणे आवश्यक आहे.
​घरकुल यादीत नाव असूनही जागेअभावी वंचित असलेल्या गरिबांचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्या कशा भरल्या जात आहेत, याची चौकशी एसीबी मार्फत करण्याची मागणी होत आहे. ​झरीची जनता आता या भ्रष्ट ‘सैराट’ कारभाराला कंटाळली आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ तपास यंत्रणा ‘अॅक्टिव्ह मोड’वर येण्याची आणि या भ्रष्ट चौकडीला तुरुंगाची हवा दाखवण्याची.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!