तंबाखू नियंत्रणाचे उल्लंघन करणा-यांकडून 14 लाखांचा दंड वसूल
प्रतिनीधी/ वर्धा :
तंबाखू सेवनाने आरोग्यावर घातक परिणाम होते. तोंडाच्या कॅन्सरसह वेगवेगळ्या प्रकारचे मुखरोग होतात. त्यामुळे नागरिकांना तंबाखुपासून दुर ठेवण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविल्या जातो. या कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू नियंत्रणाचे उल्ल्ंघन करणा-या 715 जणांवर कार्यवाही करुन त्यांच्याकडून 14 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आढावा घेतला असून तंबाखू नियंत्रणची मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण वेदपाठक यांच्यासह शिक्षण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना तंबाखूपासून दुर ठेवण्यासाठी जनजागृती व दंडात्मक कार्यवाही अशा दोन स्वरुपात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या नेतृत्वात जिल्ह्यात तंबाखू नियंत्रणासाठी काम केले जाते.
जिल्ह्यात गेल्या 6 वर्षात या कार्यक्रमाअंतर्गत तंबाखुमुळे व्याधी उदभवलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. तंबाखूचे व्यसन असलेल्या 35 हजार नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. युवापिढी तंबाखुपासुन अलिप्त रहावे म्हणून शाळांमध्ये मोठृया प्रमाणावर तंबाखू जनजागरणाचे कार्यक्रम घेतले जात आहे. विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम चित्रफितीव्दारे दाखविले जातात. जिल्ह्यात 413 शाळा पूर्णपणे तंबाखूमुक्त झाल्या आहे.
कारवाईसाठी विशेष पथक
तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे. ज्या वस्तुंना विक्रीस परवानगी आहे अशा वस्तूंवर तंबाखूचे दुष्परिणाम नमुद करणे आवश्यक आहे. तसेच शाळा कॉलेजच्या परिसरात असे पदार्थ विकता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकता येत नाही. कार्यक्रमाअंतर्गत या बाबींचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. कार्यक्रमाअंतर्गत उल्लंघनाच्या या बाबींवर कार्यवाही करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या अधिका-यांचा समावेश आहे. तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे उल्लंघन करणा-यांवर सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिले.