सिंदी (रेल्वे) -/ जुन्या कौटुंबिक वादातून इवायाचा ईनीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी घडली.रीना मनोज दांडेकर वय 40 वर्ष राहणार दिग्रज तालुका सेलू जिल्हा वर्धा असे जखमी महिलेचे नाव असून बबन मोतीराम कामडी वय 57 वर्ष राहणार दिग्रज तालुका सेलू जिल्हा वर्धा असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी कुमारी सेजल मनोज दांडेकर हिच्या तक्रारीवरून सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार जखमी महिला रीना मनोज दांडेकर व आरोपी बबन मोतीराम कामडी हे दोघेही दिग्रज गावात एकमेकांच्या घराशेजारी राहत असून दोघेही नात्याने एकमेकांचे इन-इवाई लागतात. सण 2023 मध्ये आरोपीचा मुलगा महेश कामडी याच्यासोबत जखमी महिलेची मोठी मुलगी साक्षी हिने पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, ही बाब साक्षीच्या परिवारातील लोकांना मान्य नसल्याने कामडी व दांडेकर परिवरामध्ये नेहमीच वादविवाद होत होता. दिनांक 15 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास रीना दांडेकर ही गावातील हनुमान मंदिरात शारदा देवीचा महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याने गहू, तांदूळ व डाळ हे धान्य मंदिरात देऊन आरोपी बबन कामडीच्या घरासमोरून येत असतांना जुन्या वादावरून आरोपीने रीना दांडेकर यांना शिविगाळ केली. यावरून दोघांमध्ये तोंडाटोंडी वाद झाल्याने रागाच्या भरात आरोपीने रीना दांडेकर हिला काठीने मारहाण केली.
मुलगी कुमारी सेजल दांडेकर ही आईला वाचविण्यासाठी गेली असता तिने आरडाओरडा केला. त्यामुळे गावात घराशेजारी राहणारे शुभम दांडेकर, मनोज दांडेकर, लता दांडेकर व बेबी दांडेकर यांनी आरोपीच्या तावडीतून रीना दांडेकर या महिलेची सुटका केली. परंतु, या मारहाणीत रीना दांडेकर यांच्या डोक्यावर काठीचा वार बसल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली होती. गावातील नागरिकांनी तातडीने दांडेकर यांना रक्तबंबाळ अवस्थेत सेवाग्रामच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. परंतु, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला 16 ऑक्टोबर रोजी वर्धा येथील सावंगीच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे जखमी महिलेचे पती मनोज दांडेकर यांनी बोलतांना सांगितले.
याप्रकरणी फिर्यादी सेजल मनोज दांडेकर हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास आरोपी बबन कामडी यांच्या विरुद्ध कलम 118(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहे.