सिंदी (रेल्वे) -/ नजीकच्या सेलडोह येथील झेंडा चौकातील सार्वजनिक विहिरीमध्ये युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. शिवा रामलाल पंधराम (27) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार समीपच्या सेलडोह येथील गोंडपुरा मध्ये मृतक शिवा रामलाल पंधराम हा आई व तीन भावांसोबत राहत असून त्याचे वडील रामलाल पंधराम हे गावातच दुसरीकडे किरायाने वेगळे राहतात. सोमवारी सायंकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घरामध्ये काही कारणास्तव शिवाने आई व भावांसोबत वाद घातला.त्यामुळे रागाच्या भरात शिवाने मंगळवारच्या रात्री 11 वाजताच्या दरम्यान झेंडा चौकातील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीमध्ये जाऊन उडी घेतली. परंतु, वेळीच नागरिकांच्या सतर्कतेमुळे शिवाला विहिरीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. मात्र, मध्यरात्रीच्या दरम्यान शिवाने आसपास कुणीही नसल्याची संधी साधून त्याच विहिरीमध्ये खिराडीला दोर बांधून गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली.ही बाब सकाळी गावातील नागरिकांच्या निदर्शनास आली
घटनेची माहिती सिंदी पोलिसांना मिळताच पोलीस आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाली.पोलिसांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहिल्याजाई पर्यंत मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.