🔥29 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास लावून केली होती आत्महत्या.
🔥दिव्याचा छळ करून केले आत्महत्येस प्रवृत्त
सिंदी (रेल्वे) -/पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील गौतम सुदाम लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सासू, सासरा व पतीविरुद्ध अखेर सिंदी पोलिसात भारतीय न्याय दंड संहिता 2023 नुसार कलम 108,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशा तामगाडगे,ईश्वर तामगाडगे व गिरीष तामगाडगे सर्व राहणार खडकपुरा सिंदी (रेल्वे) तालुका सेलू जिल्हा वर्धा अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्याचा विवाह 29 मार्च 2024 ला रितीरिवाजाप्रमाणे गिरीश ईश्वर तामगाडगे यांच्याशी झाला. विवाहानंतर या नवदाम्पत्याने त्यांच्या संसाराला सुरुवात केली. मात्र, सासू आशा तामगाडगे, सासरा ईश्वर तामगाडगे व पती गिरीष तामगाडगे यांच्याकडून वारंवार दिव्याचा छळ होऊ लागला. तिला मानसिक त्रास देत तिचा पती दिव्याला मारहाण सुद्धा करायचा. याबाबत दिव्याने माहेरच्यांना ही गोष्ट सांगितली. माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या मंडळींची अनेकदा समजूत काढून त्यांची मनधरणी केली. पण, तरीही तिचा सासरच्या मंडळींकडून दिव्याचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता. अखेर 29 ऑगस्ट 2024 रोजी मनोधैर्य खचलेल्या दिव्याने गुरुवारी सिंदी रेल्वे येथील खडकपुरा भागातील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना व दिव्याच्या माहेरच्यांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला होता. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
दिव्याने कुठल्या कारणाने आत्महत्या केली. तिला सासरच्या मंडळीकडून मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जात होता का ? आदींचा तपास सिंदी पोलिस करीत असताना दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी दिव्याचे वडिल गौतम सुदाम तामगाडगे रा. दिग्रज तालुका जिल्हा वर्धा यांनी सासरच्या मंडळीविरुद्ध सिंदी पोलिसात फिर्याद दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने फिर्यादी गौतम सुदाम लोखंडे राहणार दिग्रज तालुका जिल्हा वर्धा यांच्या फिर्यादीवरून सिंदी पोलिसांनी दिव्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी आशा तामगाडगे, ईश्वर तामगाडगे व गिरीष तामगाडगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता 2023 नुसार कलम 108,3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहे.