सिंदी (रेल्वे) -/जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हे गुण अंगी असल्यास कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. हालाकीच्या परिस्थितीचा बागलबुवा करून धेय्याची कास सोडणारे नंतर नशिबाला दोष देऊन मोकळे होतात. नशीबच खोटं म्हणत अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडणारे अनेक जन पाहायला मिळतात. पण परिस्थितीवर मात करीत धेय्य गाठणारं सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व फार कमी पहायला मिळतं. हालाकीच्या परिस्थितीतही लाचार न बनता सदाचारी बाणा ठेवणारा पळसगाव (बाई) येथील अत्यंत गरीब कुटुंबातील ध्येय्यवेडा तरुण संकेत रवी आदमने या तरुणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नागपूर युनिव्हर्सिटी राजस्थान कबड्डी संघामध्ये त्याची निवड झाल्याने पळसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नजीकच्या पळसगाव (बाई) येथील संकेत रवी आदमने हा युवक अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील रोजमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. संकेत एस एस ऐन जी. महाविद्यालय देवळी येथे शिक्षण घेत आहे. संकेतला लहानपणापासूनच कबड्डी या खेळाची आवड असल्याने त्याला त्याच्या वडिलांकडून नेहमी प्रेरणा मिळत गेली. संकेत हा साई स्पोर्टिंग क्लब सिंदीचा खेळाडू सुद्धा आहे. मैदानी खेळात निपुण असल्याने त्याने अनेकदा कबड्डीचे मैदानही गाजविले. कठीण परिस्थितीचा सामना करून संकेतची नागपूर युनिव्हर्सिटी राजस्थान कबड्डी संघामध्ये त्याची राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेकरिता खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा नागपूर युनिव्हर्सिटी कलर झाला, ही एक अभिमानाची बाब आहे. संकेतने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना दिले असून सर्वस्तरावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उभारी घेण्यासाठी पूरक परिस्थिती नसतांना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर संकेतने राष्ट्रीय खेळाडू होण्याचं धेय्य गाठलं. संकेतने परिस्थितीवर मात करीत यशाला गवसणी घातली आहे. स्वप्नांचा पाठलाग केला की, ते यशाचा मार्ग दाखवितात असे म्हणतात. पण, त्याकरिता डोळ्यात स्वप्न यायला हवे, हे मात्र खरे!