१५ दिवसापासून पाणीपुरवठा बंद, गुंड भर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती.
आष्टी शहीद -/कारंजा घाडगे तालुक्यातील पारडी एकांबा बोटोणा गावात रस्त्याच्या कामामुळे पाईप फुटल्या मुळे गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झाला असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.गुंड भर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरु आहे.
कारंजा (घा.)तालुक्यातील पारडी, बोटोणा, एकांबा या तिन्ही गावाकरिता कारंजा (घा.)तालुक्यातील खैरी धरणातून नारा 22या योजनेतून पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात येत होता.सध्या आष्टी ते कारंजा या मार्गावरील रस्त्यावर खोदकाम सुरु आहे. याच खोदकामात पाईप लाईन फुटल्यामुळे तिन्ही गावाचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. पंधरा दिवस झाले तरी पाईप लाईन जोडणीचे काम अदयापही सुरु करण्यात आले नाही. तिन्ही गावातील नागरिक गुंड भर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत आहे. काही नागरिक बैल बंडीवर ड्रम बांधून पाणी आणताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे पारडी व बोटोणा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. पारडी येथील सरपंच दीपाली कवारे यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारायांना पूर्व सूचना दिली आहे. खोदकाम करणारा कंत्राटदार यांना माहिती दिली मात्र पाईप लाईन जोडनी करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. बोटोणा येथील तंटा मुक्ती अध्यक्ष विनोद वानखडे यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या वेळीच सुटली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रशासनाला दिला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या तिन्ही गावात हाहाकार माजला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.