हिंगणघाट -/ येथे पी. व्ही. टेक्सटाईल्स येथे 2023-24 या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी श्री भूपेंद्र शहाणे साहेब महाप्रबंधक (निर्माणी व प्रशासन) तसेच कार्मिक विभागाचे प्रबंधक श्री यतीश परसोडकर साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना कामगार भावुक झाले होते. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कंपनीच्या स्थापनेपासुन आम्हाला कंपनी व्यवस्थापनानी काम करण्याची संधी दिली. या मिळालेल्या संधीमुळेच आमच्यापैकी अनेकांचे मुलं डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकरीमध्ये काम करत असुन स्थायी झाले आहेत अशा भावना कामगारांनी मनोगतात व्यक्त केल्या. कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला हा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो अशी भावना कामगार प्रतिनिधी प्रमोद शेंडे, पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केली. कंपनीच्या जडणघडणीमध्ये कामगारांची भूमिका अतिशय अनुकुल राहिली. प्रत्येक वेळी कामगारांनी कंपनीला मोठे करण्यामध्ये मोलाची भुमिका बजावली त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहु इच्छिते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना श्री भूपेंद्र शहाणे म्हणाले.यावेळी सेवानिवृत्त कामगारांचा मोमेंटो व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाला कामगार प्रतिनिधी प्रमोद शेंडे, पंकज त्रिपाठी, नरेंद्र रघाटाटे, सुधीर पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्मिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.