यवतमाळ -/रक्षकानेच भक्षक बनावे किंवा कायद्याच्या रक्षकानेच कायद्याची पायमल्ली करावी, असा संतापजनक प्रकार सध्या यवतमाळ पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘व्ही-लॉस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या एका हौशी ठाणेदाराने आपल्या पदाचा आणि शासकीय संसाधनाचा गैरवापर करून एका महिलेला धारणीहून चक्क पळवून आणल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ‘व्ही-लॉस’ ठाणेदार जेव्हा अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे कार्यरत होता, तेव्हापासून या प्रकरणाची पाळेमुळे रुजली आहेत. धारणी येथे असताना हा ठाणेदार एका मेसवर जेवणासाठी जात असे. त्याच मेसवर काम करणाऱ्या एका तरुण युवतीला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. प्रेमाचे जाळे म्हणा किंवा सत्तेचा धाक, या युवतीला त्याने आपल्या प्रभावाखाली घेतले.
धारणी ते दारव्हा: शासकीय वाहनाचा खासगी ‘वापर’ त्या व्हि – लाॅस
ठाणेदाराची बदली यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे झाली, मात्र त्याचे ‘अचाट’ कारनामे थांबले नाहीत. बदली होताच त्याने त्या युवतीला धारणीवरून थेट दारव्ह्याला आणले. विशेष म्हणजे, या युवतीच्या सुरक्षेसाठी किंवा दिमतीसाठी त्याने एका महिला पोलीस शिपायाची नियुक्ती केली होती, असा आरोप होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळच आपल्या शासकीय वाहनात या युवतीला तासनतास बसवून ठेवण्याचे धाडस हा ठाणेदार करत होता. शासकीय वाहनाचा असा वैयक्तिक आणि अनैतिक कामासाठी वापर पाहून पोलीस वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती.
या महाशयांचा ‘शौकीन’ स्वभाव मागील पोळ्याच्या सणादिवशी सर्वांसमोर आला. गावातील बैलांसोबत फोटोशूट करत असताना या युवतीला सोबत पाहून एका प्रतिष्ठित नागरिकाने “ही मुलगी कोण?” असा प्रश्न विचारला. या साध्या प्रश्नावर ठाणेदार चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या नागरिकावर आपला रुबाब झाडण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, जिल्ह्यातील एका सिमेंट फॅक्टरीमधील आंदोलनादरम्यान माजी मंत्र्यांची उपस्थिती असतानाही, या ठाणेदाराच्या आणि त्या युवतीच्या संबंधांची चर्चा सर्वत्र पसरली होती.
ठाणेदाराचा उद्दामपणा इतका वाढला होता की, त्याने ‘पूजा’ नामक एका महिला पोलीस शिपायाला त्या युवतीला शासकीय वाहनातून गावभर फिरवून आणण्याची आज्ञा दिली. मात्र, त्या महिला शिपायाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आणि ठाणेदाराची ‘गैरवर्तणूक’ ओळखून त्याला सडेतोड उत्तर दिले. या उत्तरामुळे ठाणेदाराची पोलीस स्टेशनमध्येच नाचक्की झाली आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्याची हशा पिकली.
या सर्व प्रकरणात शासकीय मालमत्तेचा प्रचंड गैरवापर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित पोलीस वाहनात CCTV डॅश कॅमेरा कार्यरत असल्याची माहिती आहे. जर या कॅमेऱ्याचे फुटेज, ठाणेदाराचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनची सखोल चौकशी केली, तर या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येऊ शकते. सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाचे आरोप आणि मागण्या:
शासकीय निवासस्थानाचा वापर: संबंधित महिलेला पोलीस वसाहतीतील शासकीय निवासस्थानी ठेवल्याचा आरोप.
इंधन आणि वाहनाचा अपव्यय: खरेदी आणि वैयक्तिक कामांसाठी शासकीय वाहनाचा वापर.
पदाचा दुरुपयोग: कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कामांसाठी राबवून घेणे.
नैतिक अध:पतन: कर्तव्यावर असताना एका महिलेला सोबत घेऊन फिरणे.
सीमावर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या ‘आंबट शौकीन’ ठाणेदाराने जिल्ह्याची ‘चिंता’ वाढवली आहे. कायद्याची अंमलबजावणी ज्यांच्या हातात आहे, तेच जर असे वर्तन करत असतील तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे? आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या ‘व्ही-लॉस’वर काय कारवाई करतात, की हे प्रकरण दाबले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)